जूनअखेरीस अधिकारी स्तरावर बैठक – प्रभू   

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक समस्या सोडवण्यासाठी जूनच्या अखेरीस दोन्ही देशांत अधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठक होणार आहे. पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमवरील आयात कर, वैद्यकीय उपकरणांच्या किमती, निर्यातीसंदर्भातील सवलती अशा अनेक मुद्दय़ांवर दोन्ही देशांत धोरणात्मक मतभेद असले तरी, ते सोडवण्यासाठी अमेरिका सकारात्मक असल्याची माहिती केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमवरील आयात कर अमेरिकेने वाढवल्याने भारताच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. अमेरिकेने व्हिसा देण्याबाबत कठोर धोरण अवलंबल्याचा फटका भारताच्या आयटी क्षेत्राला बसला आहे. ‘जीएसपी’च्या माध्यमातून रासायनिक पदार्थासारख्या वस्तू करमुक्त करण्याचीही मागणी भारताने केली आहे. अशा तसेच, अन्य काही मुद्दय़ांवर अमेरिकेच्या व्यापारविषयक ‘संरक्षण धोरणा’वर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. दुसऱ्या बाजूला भारतानेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या दुग्ध उत्पादनांवरील तसेच, मोटारसायकलींवरील आयात शुल्क वाढवले आहे. त्यावर अमेरिकेने आक्षेप घेतला आहे. अमेरिकेशी असलेल्या या व्यापारविषयक समस्यांवर मार्ग काढण्यासाठी दोन्ही देशांत मंत्रीस्तरावर चर्चा सुरू आहे. त्यासाठी प्रभू अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात अमेरिकेतील उद्योग, वाणिज्यमंत्री, सिनेट सदस्य तसेच उद्योग-वाणिज्य क्षेत्रातील जाणकारांशी सविस्तर बैठक झाली.

एका बैठकीत सगळे मुद्दे सोडवले जात नाहीत मात्र, त्यासाठी अमेरिकेच्या बाजूने करण्यात आलेला निर्धार हेच मोठे यश असल्याचा दावा प्रभू यांनी केला. विकसीत जी-७ देशांशीही अमेरिकेचे व्यापारविषयक मतभेद आहेत. या देशांशी चर्चा न करण्याचे धोरण अमेरिकेने स्पष्ट केले आहे. या पाश्र्वभूमीवर अमेरिका भारताशी मात्र व्यापारविषयक समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक आहे ही भारतासाठी सकारात्मक बाब आहे, असे प्रभू म्हणाले. आयात-निर्यातीच्या प्रलंबित प्रश्नांवर या महिन्यांत अधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठक होणार आहे.

इराणशी संबंध टिकवले जातील!

अमेरिकेने इराणवर आर्थिक र्निबध लादले आहेत. त्याचा भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर होणाऱ्या परिणामांबाबत प्रभू म्हणाले की, एखाद्या देशाने बंधन घातली असतील तर भारत इराणशी संबंध कसे टिकवायचे याचा वेगळ्या पद्धतीने विचार करेल. पूर्वीही इराणवर आर्थिक बंधने लादली गेली होती तरीही भारताने इराणशी संबंध टिकवले होते. संयुक्त राष्ट्राने बंधने घातली तर मात्र भारताला त्या चौकटीत संबंधांचा विचार करावा लागेल.

चीनशीही सकारात्मक चर्चा

चीनची बाजारपेठ भारतीय उत्पादनांना उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. भारतीय औषधे चीनमध्ये विकली जावीत यासाठी तेथील नियमनसंस्था भारतीय निर्यातदारांशी बैठक करणार आहे, असे प्रभू यांनी सांगितले. ‘आरसेफ’शी (ज्यांत १० आशियान देशांचा समावेश होतो) भारताचा व्यापारविषयक करार होणार आहे. मात्र, यात चीनलाही स्थान देण्यात आल्याने भारतीय उद्योग क्षेत्राने आक्षेप नोंदवला आहे. त्याबाबत प्रभू म्हणाले की, त्या त्या वेळी प्रत्येक मुद्दय़ावर चर्चा केली जाईल.

व्यापारी तूट चार महिन्यांतील सर्वाधिक

देशाच्या मे महिन्यातील निर्यातीत २८ टक्क्य़ांची वाढ होऊन ती २८.८६ अब्ज डॉलरवर गेली आहे. मात्र, आयातीतही १४.८५ टक्के वाढ होऊन ती ४३.४८ अब्ज डॉलरवर गेली आहे. त्यामुळे व्यापारी तूट १४.६२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. चार महिन्यांतील ही सर्वाधिक व्यापारी तूट आहे. गेल्या वर्षी मे २०१७ मध्ये व्यापारी तूट १३.८४ अब्ज डॉलर इतकी होती. या वर्षी मे महिन्यात कच्च्या तेलाच्या आयात मूल्यात ४९.४६ टक्क्य़ांनी वाढ होऊन ती ११.५ अब्ज डॉलरवर गेली. कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्याने आयात मूल्यातही वाढ झाली. शिवाय, सोन्याची आयातही १६.६ टक्क्य़ांनी वाढली, अशी माहिती प्रभू यांनी दिली.