कच्च्या तेलाचे दर भडकण्याची भीती

सीरियाचे अध्यक्ष बशार अल असाद यांनी डौमा येथे गेल्या आठवडय़ात केलेल्या रासायनिक हल्ल्यात निरपराध लोकांनी जीव गमावल्यानंतर, या विरोधात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या मित्र राष्ट्रांनी शनिवारी पहाटे (भारतीय वेळेनुसार) सीरियावर हल्ला केला. राजधानी दमास्कस तसेच, सीरियाच्या अन्य भागांत शंभराहून अधिक क्षेपणास्त्रे डागली गेली. त्यातील बरीचशी क्षेपणास्त्रे पाडण्यात आल्याचा दावा रशियाने केला आहे. मित्र राष्ट्रांनी केलेल्या या हल्ल्यामुळे पश्चिम आशियात ताणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘रासायनिक हल्ले करणारा सीरिया हा गुन्हेगारीचा राक्षस आहे,’ अशी प्रतिक्रिया देत अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. क्षेपणास्त्र हल्ल्यांचे सूतोवाच केले होते. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकेतील शेअर बाजारांमध्ये निराशेचे वातावरण होते, त्यामुळे बाजारात घसरणही झाली होती. त्यामुळेच सीरियावरील हल्ला शुक्रवारी शेअर बाजाराचे व्यवहार बंद झाल्यानंतर करण्यात आला. शनिवारी आणि रविवार भांडवली बाजार बंद असल्यामुळे भारतीय बाजारांमध्ये त्याचे परिणाम सोमवारी पाहायला मिळेल.

पश्चिम आशियातील संभाव्य अस्थिरतेचा विपरीत परिणाम कच्च्या तेलांच्या किमतीवरही झाला. कच्च्या तेलाच्या किमतीने गेल्या तीन वर्षांतील उच्चांक गाठला. वायदा बाजारात शुक्रवारी कच्च्या तेलाचे दर ७२ डॉलरवर पोहोचले होते. सीरियावरील कारवाईमुळे  पश्चिम आशियात तणाव कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने कच्च्या तेलाचे दर आणखी भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सीरिया केमिकल एजंट्स?

सीरियाकडे विविध प्रकारची रासायनिक अस्त्रे असून त्यापैकी सरीन आणि क्लोरीन हे विषारी वायू सीरियाने गेल्या आठवडय़ातील हल्ल्यांत वापरल्याचा दावा अमेरिका व मित्र राष्ट्रांनी केला आहे.

सरीन हा मानवी शरीराच्या चेतासंस्थेवर आघात करणारा पदार्थ आहे. तो रासायनिक अस्त्र म्हणून द्रव किंवा वायूरूपात वापरतात. तो रंगहीन आणि वासहीन असतो. तो शरीरात गेला की स्नायू आकुंचन पावणे, उलटय़ा होणे, छातीत दुखणे, शरीराच्या अवयवांचे काम बंद पडणे, व्यक्ती कोमात जाणे आणि मृत्यू होणे असे परिणाम दिसतात. व्ही एक्स नावाचा नव्‍‌र्ह एजंट इतका विषारी आहे की त्याची १० मिलिग्रॅम मात्रा मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. क्लोरीन हा सरीन आणि व्हीएक्सच्या मानाने बराच जुना वायू आहे. तो जलशुद्धीकरण प्रक्रियेतही वापरतात. तो पिवळ्या रंगाचा असून त्याला ब्लिचसारखा वास येतो. तो अत्यंत शक्तिशाली असून त्याने शरीराची आग होणे, डोळे, नाक  आणि घशाची जळजळ होणे, वासना उडणे, श्वसनास त्रास होणे असा परिणाम दिसतो. त्याचा सर्वात घातक परिणाम म्हणजे फुप्फुसात पाणी होणे. जर अधिक प्रमाणात क्लोरीनचा वापर केला तर तो ३० मिनिटांत माणसाला ठार मारू शकतो.

अस्त्रसाठय़ाचा बराच भाग नष्ट- फ्रान्सचा दावा

पॅरिस : सीरियावरील क्षेपणास्त्र हल्ल्यात तेथील रासायनिक अस्त्रसाठय़ाचा बराच भाग नष्ट झाला आहे, असा दावा फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन वेस ल ड्रायन यांनी केला आहे. सीरियातील असाद यांची राजवटच रासायनिक हल्ल्यास जबाबदार आहे हे आम्हाला पक्के ठाऊक होते. गरज वाटली तर आम्ही पुन्हा हल्ला करू, असे  ड्रायन यांनी स्पष्ट केले.