दलित मतांसाठी रस्सीखेच  बंडखोरांची सर्वच पक्षांना डोकेदुखी
भाजपच्या दोन मित्रपक्षांमध्ये वर्चस्वासाठी होत असलेली लढाई आणि महाआघाडीतील तक्रारीचे सूर या पाश्र्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्यात ४९ मतदारसंघ सोमवारी मतदानाला सामोरे जात आहेत. अनेक ठिकाणी बंडखोर सर्वच पक्षांसाठी अडचणीचे ठरले आहेत.
राज्यातील सर्वाधिक भरवशाचा दलित नेता म्हणून लोकजनशक्ती पक्षाचे (एलजेपी) प्रमुख रामविलास पासवान यांची जागा घेण्याचे हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम) चे प्रमुख जितनराम मांझी यांचे प्रयत्न चकाई मतदारसंघात दिसून येतात. ज्यांचे वडील ‘हम’चे नेते आहेत, ते येथील विद्यमान आमदार सुमित सिंग हे रालोआचे अधिकृत उमेदवार असलेल्या एलजेपीच्या विजय सिंह यांच्याविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. ही जागा आमच्यासाठी सुरक्षित होती, परंतु आता काहीही होऊ शकते, असे एलजेपीच्या उमेदवाराचा प्रचार करणारे भाजप नेते दिवेश सिंग यांनी सांगितले.
एलजेपीचे प्रदेशाध्यक्ष पशुपती पारस यांच्याकरिताही मांझी घटक महत्त्वाचा ठरत असून स्वत:चा अलौली मतदारसंघ राखण्यासाठी ते शर्थीची लढाई लढत आहेत. एका महादलित श्रेणीला अनुसूचित जातींमधून वगळण्याच्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या खेळीमुळे रामविलास पासवान यांच्या या भावाला २०१० साली स्वत:ची जागा गमवावी लागली होती. या वेळी अतिशय मागास जातींच्या लोकांची मते परत मिळवण्यासाठी ते मांझी यांच्यावर अवलंबून आहेत.
आपले वाढलेले स्थान अधोरेखित करण्यासाठी, पासवान यांनी आपल्याला अलौली येथील जाहीर सभेला दूरध्वनीवर संबोधित करण्याची विनंती केल्याची बढाई मांझी यांनी अलीकडेच मारली होती.
भागलपूरमध्ये भाजपचे नेते विजय शहा यांच्या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या निर्णयाचा, माजी खासदार शाहनवाझ हुसेन आणि बक्सरचे खासदार अश्विनी चौबे यांच्यातील वादाशी संबंध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ते चौबे यांचे पुत्र व भाजपचे उमेदवार अर्जित शाश्वत यांना लढत देत आहेत. शाश्वत ज्या वैश्य समाजाचे आहेत, त्याच्या नेत्यांनी भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या शहरी मतदारसंघात शाश्वत यांना पाठिंबा द्यावा यासाठी पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह सुशीलकुमार मोदी यांच्यासह राज्याच्या नेत्यांनी प्रयत्न केले आहेत.
सोमवारी पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या पूर्व बिहारमध्ये तसेच सीमांचलमध्ये रालोआ तितकीशी मजबूत नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. ४९ पैकी बहुतांश मतदारसंघांत भाजपने पारंपरिकरीत्या निवडणूक लढलेली नाही. याही वेळी यापैकी २२ जागांवर त्यांचे मित्रपक्षच लढत आहेत.