संयुक्त राष्ट्र्राच्या कार्यपद्धतीत सुधारणा करा अन्यथा विश्वासार्हता संपेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रीय महासभेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. करोनाची साथ हे जागतिक संकट आहे. गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून आपण या करोनाशी लढा देतो आहे. ही आपण प्रत्येकाने आत्ममंथन करण्याची वेळ आहे. जागतिक संकटाशी लढा देण्याच्या प्रयत्नांमध्ये संयुक्त राष्ट्राने कार्यपद्धतीत सुधारणा केली पाहिजे असं मोदींनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले मोदी?
संयुक्त राष्ट्रात बदलांची प्रक्रिया सुरु झाली ती पूर्ण कधी होणार? भारतातील जनता दीर्घकाळापासून त्याची वाट बघते आहे. ही प्रकिया कधी संपणार या चिंतेत भारीय आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत हा देश आहे. भारतात जगातले १८ टक्के लोक वास्तव्य करतात. हा एक असा देश आहे ज्या देशाला विविध भाषा, पंथ आणि विचारधारांची परंपरा आहे. भारतात होणाऱ्या बदलांचा प्रभाव हा जगावर होतो. अशा देशाला किती काळ वाट बघावी लागणार? संयुक्त राष्ट्र भारताला निर्णय प्रक्रियेत कधी घेणार? हा प्रश्नही मोदींनी विचारला आहे.