‘मुस्लिमांनी देशावर ८०० वर्षे राज्य केले तरीही ते आरक्षण मागत आहेत. मुस्लिम समाज मागासवर्गीय नाही. त्यामुळे त्यांना आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही,’ असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
https://twitter.com/TimesNow/status/933315203906854912
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या मुस्लिम आरक्षणाच्या मागणीवर जोरदार हल्ला चढवताना स्वामी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. टाईम्स नाऊने या संदर्भात वृत्त दिले आहे. भारतावर ८०० वर्षे राज्य करुनही मुस्लिम समाज स्वत:ला मागास समजत असेल तर त्यांच्यासाठी ही शरमेची बाब आहे. देशात ब्राह्मण, क्षत्रियदेखील गरीब आहेत. मात्र, ते कधी आरक्षणाची मागणी करत नाहीत, असे स्वामी यांनी म्हटले आहे.
धार्मिक बाबीवरुन आपण कुठल्याही प्रकारे मागासपणा निश्चित करु शकत नाही. मात्र, ओवेसी जर खरोखर कोणत्या मागास व्यक्तीचे नाव सुचवत असतील, तर त्याला आम्ही शिष्यवृत्ती देऊ शकतो. तसेच त्या व्यक्तीला मदतदेखील करु शकतो, असेही स्वामी यांनी म्हटले आहे. स्वामी पुढे म्हणाले, ओवेसी यांनी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम यांच्याप्रमाणे विचार करायला हवा. काशीराम यांनी अनुसुचित जातींना आरक्षणाचा विचार न करण्याऐवजी समाजाच्या ताकदीबद्दल विचार करण्याची शिकवण दिली होती.
असदुद्दीन ओवेसीयांनी ट्विटद्वारे मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, काँग्रेस गुजरातमध्ये पाटीदार समाजाला आरक्षण देण्यासाठी तयार आहे. मात्र, त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिमांच्या आरक्षणासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे मुस्लिमांच्या आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा इशाराही ओवेसी यांनी दिला आहे.