देशात सलग तीन दिवस करोना रुग्णांच्या संख्येत ७५ हजारांहून अधिक वाढ  झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये ७६ हजार ४७२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याआधीच्या दोन दिवसांमध्ये अनुक्रमे ७५ हजार ७६० आणि ७७ हजार २६६ रुग्णांची भर पडली होती.

देशातील एकूण करोना रुग्णांचा आकडा आता ३४ लाख ६३ हजार ९७२ झाला असून ६२ हजार ५५० मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १०२१ मृत्यू झाले. २६ लाख ४८ हजार ९९८ रुग्ण करोनामुक्त झाले असून गेल्या २४ तासांमध्ये ६५ हजार ५० रुग्ण बरे झाले. करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ७६.४७ टक्के आहे. उपचाराधीन रुग्ण सात लाख ५२ हजार ४२४ आहेत. ७ ते २३ ऑगस्ट या काळात रुग्णांची संख्या १० लाखांनी वाढली.

११० वर्षांच्या महिलेची करोनावर मात

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आता पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढत असून खाटांची मागणी ३५ टक्के वाढली आहे. दरम्यान केरळमध्ये वरीयाथू पाथू या ११० वर्षांच्या महिलेने करोनावर मात केल्याने ती राज्यासाठी महत्त्वाची कामगिरी आहे. मंजेरी येथील सरकारी रुग्णालयातून तिला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.  केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा करोनातून बरे झाले असले तरी ते अधिक उपचारासाठी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात दाखल आहेत. त्यांना लवकरच रुग्णालयातून सोडले जाणार आहे.