दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेली भारती एअरटेल भारतातील ३जी सेवा बंद करणार आहे. कंपनीने सेवा थांबवण्याची प्रक्रिया सुरू केली असुन कोलकात्यात त्याची सुरूवात झाली आहे. कंपनीने सध्या प्रति ग्राहक सरासरी उत्पन्न आणि प्रत्यक्ष वसुलीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. दूरसंचार उद्योग दीर्घकाळ टिकण्यासाठी सेवा दर वाढवण्याची गरज असल्यावर भारती एअरटेलचे भारत आणि दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल यांनी जोर दिला.

ते म्हणाले, ग्राहक २जी वरून ४जी सेवा घेत आहेत. त्यामुळे आम्ही हे अद्ययावतीकरण करीत आहोत. ३जी नेटवर्क बंद करण्याची प्रक्रिया कंपनीने अगोदर सुरू केली आहे. कोलकात्यातील सेवा जूनच्या तिमाहीत बंद झाली आहे. येत्या सप्टेंबरमध्ये आणखी सहा ते सात सर्कलमधील सेवा बंद केली जाईल. तर डिसेंबर ते मार्चमध्ये एअरटेलचे संपुर्ण देशातील ३जी नेटवर्क बंद होईल, असे गोपाल विठ्ठल यांनी सांगितले.

एप्रिल २०२० पर्यंत कंपनी २जी आणि ४जी सेवा देईल. त्यामुळे २जी ऐवजी सर्व स्पेक्ट्रम ४जीवर स्थापित केले जातील. तसेच नेटवर्कमधील समस्या दूर करण्यासाठी ३जीच्या ध्वनी लहरींवर ४जी ध्वनी लहरी सुरू करण्यात येतील. कंपनीचे सध्या ८.४ मिलियन ४जी ग्राहक आहेत. डाटाचा वापर वाढला असुन भारतीचे ग्राहकांची डाटा वापरशक्ती महिन्याला ११ जीबीपर्यंत पोहोचली आहे, असे विठ्ठल म्हणाले.