उत्तर प्रदेशात रेल्वे ट्रॅकवर काम करत असणाऱ्या तीन गँगमनला रेल्वेने धडक दिली आहे. संदिला आणि उमरतली रेल्वे स्थानकांदरम्यान ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गँगमन कोणत्याही ब्लॉकशिवाय ट्रॅकवर काम करत होते. यावेळी कोलकाता – अमृतसर एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी ही दुर्घटना झाली.
दुर्घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी चौकशी आदेश देण्यात आली असल्याची माहिती रेल्वेचे प्रवक्ता दीपक कुमार यांनी दिली आहे. ‘तिघे गँगमन कोणत्याही ब्लॉकशिवाय ट्रॅकवर ड्रिलिंगचं काम करत होते’, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
ट्रॅकवर दुरुस्ती किंवा देखभालीचं कोणतंही काम करण्याआधी संबंधित विभागाकडून ब्लॉक घेतला जातो. ट्रॅकवर काम करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्या दरम्यान कोणत्याही ट्रेन त्या मार्गाने जाऊ दिल्या नाहीत. अमृतसरमध्ये दसऱ्याला रेल्वेने ट्रॅकवर उभ्या लोकांना उडवल्याच्या घटनेनंतर आता ही घटना समोर आली आहे. अमृतसरमधील दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू झाला होता.