पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची हत्या करण्याता आली आहे. शनिवारी रात्री गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली. बिश्वास यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, सत्यजीत यांची हत्या भाजपाच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात शनिवारी रात्री ही घटना घडली. सत्यजीत बिश्वास हे कृशनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. बिश्वास हे फुलबाडी परिसरात आयोजित सरस्वती पुजेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. पुजा सुरू असतानाच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याची माहिती आहे. त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, सत्यजीत यांची हत्या भाजपच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. सत्यजीत यांच्या हत्येमागे भाजपच्या मुकूल रॉय यांचा हात असल्याचा आरोप तृणमूलचे जिल्हाध्यक्ष गिरीशंकर दत्ता यांनी केला आहे. तृणमूलमधील काही विश्वासघातकी लोकांनी भाजपच्या या कामासाठी मदत केल्याचा आरोपही तृणमूल काँग्रेसने ट्विटवरून केला आहे.