दिल्लीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक वादग्रस्त विधानं केलं आहे. जोपर्यंत दिल्लीतील नक्षली सरकार बरखास्त होत नाही तोपर्यंत पंतप्रधान मोदी दिल्लीतील कायदा सुव्यवस्थेची हमी देऊ शकत नाहीत, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन म्हटलं की, “एक गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. जोपर्यंत दिल्लीमधील श्री ४२० नक्षली दिल्ली सरकार संविधानिक नियमांनुसार बर्खास्त केलं जात नाही, तोपर्यंत पंतप्रधान मोदी दिल्लीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आश्वासनं देऊ शकत नाही.” स्वामी यांनी केजरीवाल सरकारला फसवं आणि नक्षली सरकार असं संबोधलं आहे, त्यामुळे यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना यापूर्वीही श्री ४२० असं संबोधलं आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत कोविड-१९ आजारावर नियंत्रण मिळवण्यात वेळ लागत असल्याने सुब्रमण्यम स्वामी यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. “गुजरातमध्ये केवळ १.६ टक्के करोनाचे केसेस आहेत तर दिल्लीमध्ये ९ टक्के आहेत. श्री ४२० हे दररोज टिव्हीवर दिसतात पण दिल्लीसाठी काहीही करत नाहीएत” असं ते म्हणाले होते.