03 March 2021

News Flash

नाकाबंदीत पोलिसांनी मागितलं ID, एका फोनवर त्याने परिसराचा वीजपुरवठाच खंडित केला

उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील विचित्र प्रकार ठरतोय चर्चेचा विषय

प्रातिनिधिक फोटो

उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील नाकाबंदीदरम्यान एक विचित्र प्रकार घडल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधीक्षकांबरोबरच या चौकीवरील पोलीस कर्मचारीही गोंधळून गेले. सध्या हे प्रकरण शहरामध्ये चर्चेचा विषय ठरत आङे. झालं असं की येथील लंका पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी वाराणसीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अमित पाठकही वाहनांची तपासणी करत होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास वीज विभागामध्ये काम करणारा कर्मचारी संजय सिंह याला या नाकाबंदीदरम्यान आडवण्यात आलं. पोलिसांनी चौकशी केली असता संजयने आपण वीज विभागामध्ये काम करत असल्याचे सांगितले. मात्र संजयकडे ओळखपत्राबद्दल विचारणा केली असता त्याच्याकडे ओळखपत्र नसल्याचं त्याने पोलिसांनी सांगितलं. यावरुन पोलीस आणि संजयमध्ये वाद झाला. याबद्दल वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी मध्यस्थी केली, मात्र त्यांनाही संजयला ओखळपत्र दाखवावे लागेल असं सांगितलं. यामुळे संजय अगदीच संतापला. त्याने मी कोण आहे दाखवतो असं म्हणत पुढील काही मिनिटांमध्ये असं काही केलं की सर्वजण गोंधलून गेले.

संजयने करौंदी वीज उपकेंद्रामध्ये फोन केला आणि रात्री दोन वाजून १३ मिनिटांनी नाकाबंदी करण्यात आलेल्या परिसरातील वीजपुरवठा खंडीत केला. हा प्रकार पाहून पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर एसएसपीही गोंधळून गेले. चार मिनिटांपर्यंत हा पूर्ण परिसर अंधारात होता. त्यानंतर दोन वाजून १७ मिनिटांनी संजयने परत फोन करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यास सांगितल्यानंतरच वीज आली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत एसएसपींनी संजयची तक्रार पूर्वांचल विद्युत वितरण निगमच्या व्यवस्थापकीय अध्यक्षांकडे केली आहे. या प्रकरणामध्ये चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर संजय यांच्या सांगण्यावरुनच करौंदी उपकेंद्रातील रामलखन या कर्मचाऱ्याने वीजपुरवठा खंडित केल्याचे उघड झालं. लॉगबूकमध्ये वीजपुरवठा खंडित केल्याचा आणि पुन्हा सुरु केल्याचा वेळ नमूद करण्यात आला असला तरी कारण देण्यात आलेलं नाही. हा वीजपुरवठा खंडित करताना योग्य काळजी घेण्यात आली नाही. या दोघांनाही नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे.

संजय आणि रामलखनविरोधात लंका पोलीस स्थानकामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. अशाप्रकारे वीजपुरवठा खंडित करणाऱ्यांना नोकरी गमावावी लागेल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचे न्यूज १८ हिंदीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 8:33 am

Web Title: varanasi ssp asked for id during checking electricity worker gave introduction by power cut of area scsg 91
Next Stories
1 भारतातील ही तीन विमानतळं अदानी समूहाला देण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
2 माफी मागणार नाही!
3 जी-मेलच्या सेवांमध्ये अडथळे
Just Now!
X