पश्चिम बंगालचा विकास आम्ही सातत्याने करतो आहे. मी जेव्हा बिहारला जाते, उत्तर प्रदेशात किंवा पंजाबला जाते तेव्हा तिथली भाषा बोलते. जर तुम्ही बंगालमध्ये येणार असाल तर तुम्हाला बंगाली भाषा आलीच पाहिजे असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर बंगालमध्ये येऊन रहाणाऱ्या आणि बाईकवरून फिरणाऱ्या गुंडांची गुंडगिरी मी सहन करणार नाही असाही इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee: We have to bring Bangla forward. When I go to Bihar, UP, Pujnab, I speak in their language, if you are in Bengal you have to speak Bangla. I will not tolerate criminals who stay in Bengal and roam around on bikes. pic.twitter.com/rs6FSBzCst
— ANI (@ANI) June 14, 2019
ममता बॅनर्जी या आक्रमक वृत्तीच्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार माजला होता. या हिंसाचाराचं खापर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपावर आणि भाजपाने तृणमूल काँग्रेसवर फोडलं होतं. त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारात ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळाही फोडण्यात आला होता. जो काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा बसवला.
दरम्यान काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी या जेव्हा पश्चिम बंगालचा दौरा करत होत्या तेव्हा काही जणांनी जय श्रीरामचे नारे दिले होते. त्यावेळीही त्या कारमधून काली उतरल्या आणि घोषणा देणाऱ्यांना कारवाईचा इशारा त्यांनी दिला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपाने पश्चिम बंगालमधून १५ पेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपाने बाईक रॅलीही काढली होती. आज या सगळ्याला ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या आक्रमक भाषेत उत्तर दिले आहेत. बंगालमध्ये येऊन रहायचं असेल तर बंगाली भाषा आलीच पाहिजे अशी आग्रही भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे.