नवी दिल्ली : फ्रान्ससह एकूण सतरा युरोपीय देशांनी अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या भारतात तयार केलेल्या कोव्हिशिल्ड या लशीस मान्यता दिली आहे. ही मान्यता आधी नव्हती, त्यामुळे व्हिसा मिळण्यात अडचणी येत होत्या व दरम्यानच्या काळात अनेकांनी कोव्हिशिल्ड ही लस घेतली होती.

युरोपीय समुदायाने भारताला असे कळवले आहे, की आमच्या समुदायातील किमान सतराहून अधिक देशात कोव्हिशिल्डला मान्यता देण्यात आली आहे. त्यात ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आइसलँड, आर्यलड, स्पेन, स्वित्र्झलड, एस्टोनिया या देशांचा समावेश आहे.

गेल्या आठवडय़ात जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी ट्विट संदेशात म्हटले होते, की युरोपीय समुदायातील १७ देशांनी कोव्हिशिल्ड लशीला मान्यता दिली आहे. फ्रान्सनंतर बेल्जियम, बल्गेरिया, फिनलंड, जर्मनी, हंगेरी, नेदरलँडस, स्पेन, स्वीडन, लॅटव्हिया या देशांनीही लशीला मंजुरी दिली होती.

या घटनेबाबत सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे प्रमुख अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटले आहे, की आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एकूण १७ युरोपीय देशांनी आमच्या लशीला मान्यता दिली आहे. लशीला मान्यता दिली असली तरी प्रत्येक देशातील निकष पार पाडावे लागतील.

युरोपीय समुदायाने ग्रीन पास योजना सुरू केली असून त्यात परदेश प्रवासासाठी प्रमाणपत्र दिले  जाते. आता सतरा देशांनी मान्यता दिल्यामुळे कोव्हिशिल्ड लस घेतलेल्यांना परदेश प्रवासासाठी जाता येईल, पण ज्या देशात करोनाविरोधात हवाई प्रतिबंध लागू आहेत तेथे जाता येणार नाही. लसीकरणाचे डिजिटल प्रमाणपत्र आता या देशांमध्ये ग्राह्य़ धरले जाणार आहे. काही ठिकाणी चाचणी निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र असेल तरी ते पुरेसे मानले जाणार आहे.

युरोपीय वैद्यक संस्थेने कोव्हिशिल्डला अगोदर मान्यता दिली नव्हती व त्यांच्या यादीत त्या लशीचा समावेश नव्हता, त्यामुळे लोकांना अडचणी येत होत्या. आधी लस पारपत्रात केवळ फायझर, मॉडर्ना, अ‍ॅस्ट्राझेनेका, जॉन्सन या लशींचा समावेश करण्यात आला होता.

फ्रान्समध्ये सीमाबंदी दरम्यान डेल्टा विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी फ्रान्सने सीमाबंदी जारी केली असून रविवारपासून फ्रान्समध्ये ब्रिटन, स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँडस, ग्रीस व सायप्रस या देशातून येणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. २४ तासांतील निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी सांगितले,की १५ सप्टेंबपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होणार असून रेस्टॉरंट, बार, रुग्णालये, शॉपिंग मॉल, रेल्वे व विमानतळ येथे कोविड पासेस जारी करण्यात येणार आहेत.