23-year-old BTech graduate arrested for robing Uber Rapido cab drivers Crime News : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल (CGL) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका बीटेक पदीधर विद्यार्थ्याला टॅक्सी चालकाला लुटल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हा विद्यार्ध्यी दिल्लीत रॅपिडो किंवा उबर अॅप्सवर गाडी बुक करून नंतर या बाईक टॅक्सी चालकांना लुटायचा, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव जावेद खान (२५) असे असून तो मूळचा राजस्थानचा आहे. खान याने चालकांना गांधी विहार येथील निर्जन स्थळी घेऊन जात बंदुक धाक दाखवून दोन वेळा चालकांना लुटल्याचा आरोप आहे. तसेच आरोपी हा अशा ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्या चालकांची दुचाकी, फोन आणि पैसे घेऊन पळ काढत असे.
खान हा सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या इतर विद्यार्थ्यांबरोप २०२४ पासून मुखर्जी नगर येथे राहतो आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याच्यावर राहुल नावाच्या एका मित्राचे ३५,००० हजार रुपयांचे कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी त्याने रॅपिडो आणि उबर चालकांना लुटण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी सांगितले की खान याने पहिली चोरी ही ३१ मे रोजी केली होती. यावेळी त्याने नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून गांधी विहारमध्ये जाण्यासाठी उबर बाईक सेवा बुक केली होती. त्याची काम करण्याची पद्धत अशी होती की, तो चालकाला राईड कॅन्सल करायला सांगून त्यांना ठिकाणापर्यंत ऑफलाईन घेऊन जायाचा. असे केल्याने चालकाला त्याच्या भाड्याचे कमिशन देखील त्याच्याकडेच ठेवता येत असे, असे पोलिसांनी सांगितले.
“रात्री १.३० वाजता रायडर येताच जावेदने त्याला सांगितलं की तो राईड कॅन्सल करेल, ज्यासाठी चालकाने देखील होकार दिला. पहाटे २.३० च्या सुमारास, जेव्हा ते योगराज कॉलनीजवळील निर्जण ठिकाण असलेल्या गांधी विहार ड्रेन येथ पोहोचले तेव्हा खानने चालक सोनूच्या कंबरेवर देशी बनावटीची पिस्तूल लावले आणि त्याला धमकावून मोटारसायकल थांबवायला सांगितले,” असे एका अधिकार्याने सांगितले.
त्यानंतर आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून मोटारसायकल, एक मोबाईल फोन आणि दोन हजार रुपये लुटले आणि आणि लुटलेल्या मोटारसायकलवरून पळून गेला, असे पोलीस उपायुक्त (उत्तर) राजा बांठिया यांनी सांगितले.
रॅपिडो चालक प्रदीप सिंह याने पोलिसांना सांगितले की, अशाच एका दुसर्या घटनेत सोमवारी निझामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून गांधी विहारसाठी बुकिंग झाले. मात्र रेल्वे स्टेशनला पोहचल्यावर ग्राहक जावेद खान याने राईड कॅन्सल केली आणि निर्जन स्थळी पोहचल्यानंतर सिंह याला लुटण्यात आले. त्याच्याकडून ६०० रुपये आणि त्याचा मोबाईल फोन लुटण्यात आला होता.
एनडीएलएस ते तिमारपूरमधील गांधी विहारपर्यंत सर्व सीसीटीव्ही कॅमेरे ट्रॅक केल्यानंतर , दिल्ली पोलिसांनी बुधवारी खानला संकल्प भवन परिसरात शोधून काढले. खान हा राजस्थानमधील भरतपूरचा रहिवासी आहे, असे पोलिसांनी सांगितले.
चोकशीत खान याने सांगितले की,त्याच्यावर कर्ज होते आणि त्याच्या मित्राने हे कर्ज परत करण्यासाठी गुन्हा करण्यास प्रवृत्त केले. “राहूलने त्याला .३१५ बोरच्या १७ जिवंत काडतूसांसह देशी बनावटीचे पिस्तूल दिले आणि त्याने रात्री उशीराच्या वेळेत ऑनलाइन दुचाकी चालकांना लुटण्याची योजना आखून दिली. त्याच्या योजनेनुसार खानने वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावरून रात्री उशीपा रायडर बुक केला, असे डीसीपी बांठिया म्हणाले.