लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री तुरुंगात गेले आहेत. कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून ते तिहार तुरुंगात आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये १४ आणि दिल्लीत आपचे ७ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आप पक्ष कोंडीत सापडला आहे. एकीकडे पक्षाध्यक्ष तुरुंगात तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुका. यामुळे अरविंद केजरीवाल यांना झालेल्या शिक्षेमुळे आपला फायदा होणार की तोटा असा प्रश्न उपस्थित आहे. यावर, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

कथित मद्यविक्री घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस जिल्हा न्यायालयाने सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली. त्यामुळे आम आदमी पक्षाला जबरदस्त दणका बसला आहे. याबाबत फारूख अब्दुल्ला म्हणाले, अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्याने ते मोठे नेता बनले आहे. जेलमध्ये गेल्याने त्यांचा आदर वाढला आहे. ज्या जागेवरून आपण हरू अशी भीती होती, त्या जागेवर इंडिया आघाडी आता नक्की जिंकणार आहे.

“अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा ‘आप’ला खूप फायदा होणार आहे. पंजाबमधील १३ च्या १३ जागा आप जिंकणार आहे. तर, दिल्लीतील सात जागाही आप जिंकेल. हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्येही आप विजयी होईल”, असं फारुख अब्दुल्ल म्हणाले.

मद्य घोटाळ्यात आत गेलेले तिसरे नेते

कथित मद्यविक्री घोटाळ्यात तिहार तुरुंगात कैद असलेले केजरीवाल ‘आप’चे तिसरे नेते आहेत. यापूर्वी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात भारत राष्ट्र समितीच्या नेत्या व तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. कविता यांनाही न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. 

हेही वाचा >> अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगामध्ये

न्यायालयाने दोन वेळा ‘ईडी’ची कोठडी दिल्यानंतर सोमवारी केजरीवाल यांची रवानगी तुरुंगात केली. केजरीवाल यांना तुरुंग क्रमांक-२ मध्ये ठेवण्यात आले असून कोठडीमध्ये केजरीवाल एकटेच आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असतील. राऊस जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी दुपारनंतर केजरीवालांना तिहार तुरुंगात आणण्यात आले. दररोजची औषधे तसेच, विशेष स्वरूपाचे जेवण त्यांना पुरवले जाईल. त्यांना कोठडीमध्ये पुस्तके वाचण्याची मुभा मिळाली आहे.