scorecardresearch

विरोधी पक्षातील नेत्यांवरच ईडी आणि सीबीआयच्या छापेमारीचा आरोप, अमित शाहांचं सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले…

“कोणत्याही तपास यंत्रणेने बजावलेल्या नोटीशीला तुम्ही…”

amit shah
अमित शाह ( फेसबूक छायाचित्र )

अलीकडच्या काही वर्षात विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी आणि सीबीआयमार्फत मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत. राजकीय सूडबुद्धीने या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जातो. दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगडमधील विरोधी पक्षातील नेत्यांवर आतापर्यंत छापे पडले आहेत. काही जणांची चौकशी सुरू असून, काहींची तुरुंगात रवानगी झाली आहे. यावर आता देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केलं आहे.

‘इंडिया टुडे’ने आयोजित करण्यात आलेल्या कॉनक्लेवमध्ये अमित शाह बोलत होते. विरोधी पक्षातील नेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अमित शाह म्हणाले, “२०१७ साली उत्तरप्रदेशच्या निवडणुका होत्या. तेव्हा काँग्रेसची एक महिला नेता म्हणाली, आम्ही भ्रष्टाचार केला आहे, तर कारवाया का? केल्या जात नाहीत. त्यांनी आमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता कारवाया केल्या जात असून, ओरडत आहेत.”

हेही वाचा : २०२४ च्या निवडणुकीनंतर मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील; अमित शाहांचा विश्वास

“कोणत्याही तपास यंत्रणेने बजावलेल्या नोटीशीला तुम्ही न्यायालयात आव्हान देऊ शकता. तसेच, कोणत्याही एफआयआर आणि चार्जशीटलाही न्यायालयात आव्हान देता येत. त्यामुळे न्यायालयात जाण्याऐवजी ओरडून काय फायदा,” असा टोला अमित शाहांनी लगावला आहे.

“आता जे ओरडत आहेत, त्यांच्यातील २ प्रकरण सोडून, बाकींच्या सर्व गुन्ह्यांची नोंद त्यांच्या काळात झाली आहे. अलीकडच्या वर्षात काहीही दाखल झालं नाही. यांनी १२ लाख कोटी रूपयांचे घोटाळे केले असून, सीबीआयमध्ये गुन्हा दाखल झाला होता. मग, न्यायालयात जाण्यासाठी यांना कोण थांबवत आहे. आमच्या पक्षात कमी आणि त्यांच्याकडे सर्वात जास्त चांगले वकील आहेत,” असेही अमित शाहांनी म्हटलं.

हेही वाचा : फेसबुक आणि यूट्यूबवर डोनाल्ड ट्रम्प यांचं दोन वर्षांनी पुनरागमन; बंदी उठवताच म्हणाले…

लालू प्रसाद यादव, मनीष सिसोदिया, के. कविता, शिवसेना किंवा ममता बॅनर्जींच्या पक्षातील लोकांवरच ईडी कारवाई केली जाते, असा आरोप आहे. यावर अमित शाहांनी सांगितलं, “जनता प्रत्येक गोष्ट पाहत आहे. तपास यंत्रणा स्वतंत्र पद्धतीने काम करत आहेत.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 12:10 IST