हरिवंशराय बच्चन यांच्या ‘नीड का निर्माण’ या कवितेचं वाचन आणि त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केल्यामुळं बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आपचे नेते आणि कवी कुमार विश्वास यांना कायदेशीर नोटिस बजावली होती. संबंधित व्हिडिओ आणि ऑडिओ डिलिट करून त्यातून कमावलेले पैसे देण्याची मागणी अमिताभ यांनी नोटिशीद्वारे केली होती. त्यावर कुमार विश्वास यांनी अमिताभ यांना उत्तर दिलं आहे. कविता सादर केल्यानंतर सर्व कवींनी त्याचं कौतुक केलं. पण तुमच्याकडून नोटीस मिळाली. बाबूजींना श्रद्धांजली वाहिल्याचा व्हिडिओ डिलिट करत असून त्यातून कमावलेले ३२ रुपये तुम्हाला पाठवत आहे, असं विश्वास यांनी म्हटलं आहे.

कुमार विश्वास यांनी काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेचं वाचन केलं होतं. त्यावर अमिताभ बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच कुमार विश्वास यांना ‘कॉपीराइट’चं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती. कुमार विश्वास यांनी ती कविता मागे घ्यावी आणि यातून होणारी कमाई परत करावी, अशी मागणी अमिताभ यांनी नोटिशीद्वारे केली होती. हरिवंशराय बच्चन यांची कविता परवानगीशिवाय सार्वजनिक कार्यक्रमात सादर केलीच कशी, असा प्रश्न अमिताभ यांनी उपस्थित केला होता. विश्वास यांनी कॉपीराइटचं उल्लंघन केलं, असा त्यांचा आरोप आहे. विश्वास यांनी ‘नीड का निर्माण’ ही कविता यूट्युबवर अपलोड केली होती. त्यावर अमिताभ यांनी नोटीसही पाठवली होती. त्यानंतर कुमार विश्वास यांनी ही कविता मागे घेण्याचं मान्य केलं होतं. हरिवंशराय बच्चन यांना श्रद्धांजली वाहण्याच्या हेतूनं ही कविता सादर केली होती, असं स्पष्टीकरण विश्वास यांनी दिलं होतं. या प्रकारामुळं अमिताभ व्यथित झाले असून, मी यूट्यूबवरून संबंधित व्हिडिओ हटवत आहे. अमिताभ यांनी नाराज होऊ नये, असं विश्वास यांनी म्हटलं होतं.