AAP MLA Resignation पंजाबच्या खरार विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या आमदार आणि पंजाबी गायिका अनमोल गगन मान यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. याबरोबरच त्यांनी आमदार पदाचाही राजीनामा दिला आहे. आपल्या सोशल मिडीयावरून त्यांनी ही माहिती दिली. या बातमीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

आपच्या आमदाराकडून राजीनाम्याची घोषणा

आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्या अनमोल गगन मान यांनी रविवारी खरार मतदारसंघातून पंजाब विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी राजकारण पूर्णपणे सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे आणि पंजाब विधानसभेचे अध्यक्ष कुलतार सिंग संधवान यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. २०२४ साली भगवंत मान यांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळले होते. त्यामुळे, या निर्णयाची चर्चा होत आहे.

‘एक्स’ वर पंजाबी भाषेत लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “माझे मन भारावले आहे, पण मी राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी माननीय सभापतींना आमदारपदाचा राजीनामा स्वीकारण्याची विनंती करते. माझ्या शुभेच्छा पक्षाबरोबर आहेत. मला आशा आहे की पंजाब सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल.” त्यांच्या या निर्णयामुळे ‘आप’मध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

कोण आहेत अनमोल गगन मान

अनमोल गगन मान यांचा जन्म १९९० साली मानसा मध्ये झाला. चंडीगडमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. २०२४ साली त्यांचा विवाह पेशाने वकील असणार्‍या शाहबाज सिंग सोही यांच्याशी झाला. मान २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत खरारमधून निवडून आल्या. त्यांनी अकाली दलच्या रणजीत सिंग गिल यांचा ३७,७१८ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी त्या पक्षातील सर्वात तरुण आमदार होत्या. त्यांनी मंत्री म्हणूनही काम केले आणि त्यांनी पर्यटन आणि संस्कृती, गुंतवणूक प्रोत्साहन, कामगार आणि आतिथ्य ही खाती सांभाळली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु, गेल्या वर्षी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंत्रिमंडळातून वगळलेल्या चार मंत्र्‍यांमध्ये त्यांच्याही नावाचा समावेश होता. राजकारणात येण्यापूर्वी त्या पंजाबमध्ये एक गायिका म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांना सूट, घैंट पर्पज आणि शेरनी या पंजाबी गाण्यांसाठी ओळखले जायचे. जर त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला, तर त्यांच्या भागात पोटनिवडणूक घेतली जाईल.