Apple Store Robbery Los Angeles 2025: अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये बेकायदा स्थलांतरितांविरोधात डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कठोर कारवाईस सुरुवात केली आहे. या कारवाईविरोधात गेल्या काही दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. आता या निदर्शनांना हिंसक वळण मिळाले आहे. कागदपत्रे नसलेल्या बेकायदा स्थलांतरितांना सरकारकडून लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या घरांवर छापे टाकले जात आहेत. त्याचाच विरोध म्हणून मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल गार्ड तैनात करण्याची घोषणा केली होती.

अशात सोमवारी रात्री लॉस एंजेलिसच्या डाउनटाउनमध्ये मास्क घातलेल्या काही नागरिकांनी आंदोलनाचा फायदा घेत एका अ‍ॅपल स्टोअरवर आणि इतर अनेक दुकानांवर हल्ला केला. यावेळी त्यांनी दुकानांची तोडफोड केली. तसेच अ‍ॅपल स्टोअरमधून मोठ्या प्रमाणात फोन आणि आयपॅड्सची चोरी केली. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये मास्क घातलेले हे नागरिक अ‍ॅपल स्टोअर आणि इतर दुकानांचीही तोडफोड करत असल्याचे दिसत आहे. यामध्ये अ‍ॅडिडास स्टोअर, फार्मसी, दवाखाने आणि दागिन्यांची दुकाने यांचा समावेश आहे.

लॉस एंजेलिस पोलीस विभागाचे अधिकारी क्रिस मिलर म्हणाले, “अ‍ॅपल स्टोअरमध्ये चोरी करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली.” एनबीसी लॉस एंजेलिसच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी आणखी दोन लोकांना अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचाराशी संबंधित अटकांची नेमकी आकडेवारी जाहीर केलेली नाही.

आतापर्यंत किमान ५० जणांना अटक

लॉस एंजेलिसमध्ये गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या आंदोलन आणि हिंसाचारादरम्यान आतापर्यंत किमान ५० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एका व्यक्तीवर पोलिसांवर मोलोटोव्ह कॉकटेल फेकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. लॉस एंजेलिसचे पोलीस प्रमुख जिम मॅकडोनेल म्हणाले की, काही आंदोलकांनी पोलिसांवर फटाके फेकण्याचा प्रयत्न केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लॉस एंजेलिस कर्फ्यू लागू

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लॉस एंजेलिसच्या महापौर करेन बास यांनी मंगळवारी अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहराच्या डाउनटाउन भागात कर्फ्यू जाहीर केला. “मी स्थानिक आणीबाणी जाहीर केली असून, तोडफोड आणि लूटमार थांबवण्यासाठी लॉस एंजेलिसच्या डाउनटाउनमध्ये कर्फ्यू लागू केला आहे”, त्यांनी पत्रकारांना सांगितले.