पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातून मिळालेल्या २७७२ भेटवस्तूंचा १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन लिलाव सुरु आहे. या लिलाव प्रक्रियेत लोक आश्चर्यकारकरित्या बोली लावत आहेत. यामध्ये अनेक मोदी प्रेमींकडून कोट्यवधी रुपयांची बोली लावत वस्तू खरेदी करण्यात आल्या आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पतंप्रधानांना भेट म्हणून दिलेला एक चांदीचा कलश नुकताच १ कोटी रुपयांना विकला गेला होता. ज्याची सुरुवातीची लिलावाची रक्कम १८,००० रुपये होती. या कलशाव्यतिरिक्त मोदींच्या भेटवस्तूंमधील आणखी एका वस्तूचा एक कोटी रुपयांमध्ये लिलाव झाला आहे. ती वस्तू म्हणजे मोदींची फोटो फ्रेम. या फ्रेममध्ये मोदींच्या फोटोसह गुजराती भाषेत त्यांचा एक संदेशही लिहिलेला आहे. या फ्रेमची सुरुवातीची लिलावाची किंमत केवळ ५०० रुपये होती.

त्याचबरोबर मोठ्या किंमतीला विकल्या गेलेल्या इतर अनेक भेटवस्तूंमध्ये एक धातूची मूर्ती देखील आहे. गाय आपल्या वासराला दूध पाजत असल्याची ही मूर्ती आहे. याची लिलावाची सुरुवातीची किंमत १,५०० रुपये होती. मात्र, ही मूर्ती तब्बल ५१ लाख रुपयांना विकली गेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा हा दूसरा लिलाव आहे. जानेवारी महिन्यांत देखील अशाच प्रकारे लिलाव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ४ हजारांहून अधिक बोली लावणारे लोक होते. त्यावेळी लिलावात १८०० भेटवस्तू ठेवण्यात आल्या होत्या.

या वर्षी लिलावासाठी ठेवलेल्या वस्तूंचे आधार मुल्य २०० रुपयांपासून २.५ लाख रुपयांपर्यंत आहे. २,७७२ भेटवस्तूंमध्ये शाल, जॅकेट, पोर्टेट, तलवार आदी वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. भेटवस्तूंचा ई-लिलाव http://www.pmmementos.gov.in या वेबसाईटवर ३ ऑक्टोबरपर्यंत सुरु आहे.