अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज, शनिवारच्या भेटीसाठी अयोध्या शहर सज्ज झाले आहे. फुले, म्युरल्स आणि सजावटीचे स्तंभ यांनी शहर नटले असून, शहरात सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

पुनर्विकसित करण्यात आलेल्या अयोध्या रेल्वे स्थानकाचे आणि नव्या विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी या शहरात येत आहेत.

सकाळी पावणेअकराच्या सुमारास अयोध्या विमानतळावर आगमन झाल्यानंतर मोदी थेट अयोध्या रेल्वे स्थानकावर जाऊन त्याचे उद्घाटन करतील. यानंतर ते विमानतळावर परत येतील व नवनिर्मित विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर ते जाहीर सभेला संबोधित करतील. सुमारे तासभर चालणाऱ्या या सभेला दीड लाख लोक हजर राहण्याची अपेक्षा आहे, असे अयोध्येचे विभागीय आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ट्रम्प यांच्यावर अमेरिकेच्या मेन राज्यात निवडणुकीस बंदी

अलीकडेच पुनर्विकसित करण्यात आलेल्या ‘राम पथाच्या’ आणि रेल्वे स्थानक ते विमानतळ या पंतप्रधानांच्या मार्गावरील इतर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना तात्पुरते लाकडी अडथळे उभारण्याचे काम प्रशासनाने गुरुवारी सुरू केले.

विमानतळ ते रेल्वे स्थानक या दरम्यानच्या मार्गावर मोदी ‘रोड शो’ करतील आणि अयोध्यावासीयांच्या स्वागताचा स्वीकार करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा आणि ‘अयोध्येच्या पवित्र शहरात स्वागत’ असा संदेश असलेली भव्य पोस्टर्स या शहरातील निरनिराळया प्रमुख ठिकाणी उभारण्यात आली आहेत. राम मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर ‘प्रभू राम की नगरी में आपका स्वागत है’, असा संदेश असलेले प्रचंड पोस्टर लावण्यात आले आहे.

परिक्रमा मार्ग भागात मद्यविक्रीला बंदी

अयोध्येतील राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होण्यापूर्वी, या शहरातील पंचक्रोशी परिक्रमा मार्गावर मद्याच्या विक्रीला बंदी घालण्यात आल्याचे राज्याचे मंत्री नितीन अग्रवाल यांनी सांगितले.

‘अयोध्या हे प्रमुख तीर्थस्थळ असून, रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून व जगातून लोक येथे येतात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली, अयोध्येतील पंचक्रोशी परिक्रमा मार्गावर मद्यविक्रीला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला’, असे उत्पादन शुक्ल व दारूबंदी खात्याचे मंत्री असलेले अग्रवाल म्हणाले.

हेही वाचा >>> दिल्लीत झुंडबळींसाठी भरपाई योजनेला मंजुरी

या भागात दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे. दारूविक्रीची सर्व दुकाने हटवण्यात आली असून, तेथे दुकाने उघडण्याची कुणालाही परवानगी दिली जाणार नाही, असे मंत्र्यांनी सांगितले.

अयोध्या धाम रेल्वे स्थानकाला मंदिराचा साज

शिखराच्या आकाराचा घुमट आणि भगवान श्रीरामाच्या हाती आढळणारा धनुष्यबाण अशी वरच्या भागातील रचना असलेल्या अयोध्या रेल्वे स्थानकाला एखाद्या मंदिरासारखाच साज चढवण्यात आला आहे. या पुनर्विकसित अयोध्या जंक्शन स्थानकाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.

अयोध्या रेल्वे जंक्शनचे ‘अयोध्या धाम जंक्शन’ असे नामांतर करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक खासदार लल्लू सिंह यांनी बुधवारी दिली. नवी इमारत जुन्या इमारतीशेजारीच आहे.  अयोध्या शहरात असलेले अयोध्या जंक्शन आणि फैजाबाद शहरातील अयोध्या कँट (पूर्वीचे फैजाबाद जंक्शन) अशी दोन मुख्य रेल्वे स्थानके अयोध्या जिल्ह्यात  आहेत. २०१९ साली फैजाबाद जिल्ह्याचे अयोध्या जिल्हा असे नामांतर करण्यात आल्यानंतर दोन वर्षांनी फैजाबाद जंक्शनचे नावही बदलण्यात आले.

निमंत्रणाबाबत काँग्रेसचा निर्णय योग्य वेळी

नवी दिल्ली :  काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी हे २२ जानेवारीला अयोध्येतील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाला उपस्थित राहतील अथवा नाही याबाबतचा निर्णय ‘योग्य वेळी’ घेतला जाईल, असे काँग्रेसने शुक्रवारी सांगितले.

सोनिया गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांना राममंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हे दोघे तेथे जातील की नाही याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल व योग्य वेळी कळवला जाईल, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितले. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे.

‘धार्मिक भावनांचा घोर दुरुपयोग’

कन्नूर :  इतर घटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणारे राममंदिराचे उद्घाटन हा भाजपचा राजकीय उद्दिष्टासाठी ‘धार्मिक भावनांचा घोर दुरुपयोग’ आहे, अशी टीका माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली. धर्माची राजकारण व सरकारपासून फारकत अशी धर्मनिरपेक्षतेची स्पष्ट व्याख्या घटनेत करण्यात आली आहे, असे येचुरी यांनी पत्रकारांना सांगितले. अन्य नेत्यांप्रमाणे येचुरी यांनाही या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळाले, पण त्यांनी ते नाकारत असल्याचे जाहीर केले आहे.