How To Check Ayushman Card Eligibility : पैसा आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. वाढत्या वयानुसार अनेकांना वेगवेगळे आजार होऊ लागतात. त्यामुळे स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चांगल्या उपचारांची व त्यासाठी पैशांची आणि योग्य रुग्णायालची माहिती असणे खूप जास्त गरजेचे असते. तर, त्यासाठी केंद्र शासनाने २०१८ पासून एका योजना सुरू केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा ७० वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना‘ (AB PM-JAY) राबविली जाते.
तर, आज आपण या बातमीतून आयुष्यमान योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं, लाभार्थीची पात्रता कशी निश्चित होते, तुम्ही योजेसाठी पात्र आहात की नाही हे ऑनलाइन तपासता येते का आणि कसं याबद्दल जाणून घेणार आहोत.
या योजनेमुळे लाभार्थीला पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकतात. आरोग्य विम्यात वैद्यकीय तपासणी, सल्लामसलत, उपचार, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच्या सेवा, नॉन-इंटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह केअर अशा दोन्ही सुविधा, औषधे, वैद्यकीय वस्तू, वैद्यकीय चाचण्या, निवास व्यवस्था, आवश्यकतेनुसार वैद्यकीय सुविधा, अन्न सेवा आणि १५ दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च अशा विविध घटकांचा समावेश आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी पात्रता २०११ च्या सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना (एसईसीसी-२०११) मधील डेटाच्या आधारे निश्चित केली जाते.
ग्रामीण आणि शहरी कुटुंबांसाठी खालील निकष लागू होतात ते पुढीलप्रमाणे… (Eligibility Criteria Of PMJAY For Rural And Urban)
१. ग्रामीण कुटुंबे
- कच्च्या मातीने किंवा इतर टिकाऊ नसलेल्या साहित्याने बांधलेली आणि फक्त एकच खोली असणाऱ्या घरात राहणारी कुटुंबे.
- १६ ते ५९ वयोगटातील प्रौढ पुरुष सदस्य नसलेली कुटुंबे.
- कमीत कमी एक अपंग सदस्य आणि त्यांच्या आधारासाठी सक्षम प्रौढ सदस्य नसलेली कुटुंबे.
- अनुसूचित जाती (एससी) किंवा अनुसूचित जमाती (एसटी) समुदायातील कुटुंबे.
- भूमिहीन कुटुंबे जी उपजीविकेसाठी प्रामुख्याने शारीरिक, प्रासंगिक मजुरीवर अवलंबून आहेत.
२. शहरी कुटुंबे
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ खालील व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना लागू होतो…
- घरगुती कामगार
- रस्त्यावर स्टॉल लावणारे विक्रेते
- स्वच्छता कामगार
- बांधकाम कामगार
- वाहतूक कामगार (ड्रायव्हर, कंडक्टर आणि रिक्षाचालक)
आयुष्मान भारत योजनेसाठी ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पात्रता आणि निकष काय असणार? (Eligibility Criteria For senior citizens above 70 years)
- १२ सप्टेंबर २०२४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या विस्ताराला मंजुरी दिली. त्यामध्ये ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांची सामाजिक, आर्थिक स्थिती काहीही असो; या योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जाईल. या विस्तारामुळे ज्येष्ठ नागरिकांवरील आरोग्य सेवेसाठी आवश्यक असलेला आर्थिक खर्चाचा भार कमी होईल. केंद्र आणि राज्य सरकार या विस्तारित योजनेसाठी होणारा खर्च वाटून घेतील.
- आयुष्मान भारत योजनेंतर्गत (Ayushman Bharat Yojana) आधीच समाविष्ट असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्य विम्याच्या अतिरिक्त पाच लाख रुपये टॉप-अप कव्हर म्हणून देण्यात येईल. या रकमेचा उपयोग फक्त ज्येष्ठ नागरिक करू शकतात; पण त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत.
- खासगी आरोग्य विमा असलेले ज्येष्ठ नागरिकदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
जे ज्येष्ठ नागरिक आधीच केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS), माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) किंवा आयुष्मान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) यांसारख्या सार्वजनिक आरोग्य विमा योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना दोनपैकी एक पर्याय उपलब्ध आहे. एक तर त्यांनी सध्याची योजना सुरू ठेवावी किंवा आयुष्मान भारत योजनेची निवड करावी.
आयुष्मान भारत योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का हे ऑनलाइन कसे तपासायचे (How To Check Ayushman Bharat Yojana eligibility Online)
- आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा
- होमपेजवरील ‘Am I Eligible’ या सेक्शनमध्ये प्रवेश करा.
- पुढील पेजवर तुमचा मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
- नंतर ‘ओटीपी जनरेट करा’ बटणावर क्लिक करा.
- तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी तिथे टाका आणि ‘Verify OTP’ या बटणावर क्लिक करा.
- पुढील पेजवर नाव, राज्य, वय, कुटुंबातील सदस्य आणि उत्पन्नाचा तपशील यांसारखी आवश्यक माहिती भरून घ्या.
- सर्व माहिती लिहिल्यानंतर सबमिट करा’ या बटणावर क्लिक करा.
तर, अशा प्रकारे तुम्ही ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी’ पात्र आहात का याबद्दल ऑनलाइन आणि ऑफलाइन जाणून घेऊ शकता.