ललित मोदी यांचा मुद्दा वादग्रस्त ठरत असल्याचे पाहून सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून आपली बाजू मांडली. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर सुषमा स्वराज यांचे कृत्य योग्य असल्याचे सांगून त्याचे समर्थन केले आणि सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. विरोधी पक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीशी आपण सहमत नसल्याचे ते म्हणाले. स्वराज यांनी मानवतेनुसार कृती केली असून यात फार मोठा नैतिक मुद्दा गुंतलेला नाही, असे सांगून भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांचे समर्थन केले.  बोफोर्स घोटाळ्यातील आरोपी ओटाविओ क्वाट्रोची यांना भारतातून पळून जाण्यात मदत करणे आणि युनियन कार्बाइडचे प्रमुख वॉरन अँडरसन यांना देश सोडून जाण्यात मदत करणे यापेक्षा हे प्रकरण वेगळे असल्याचा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
काँग्रेसची टीका
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुर्जेवाला यांनी सुषमा स्वराज यांनी नैतिक आधारावर ताबडतोब राजीनामा देण्याची मागणी केली, तर सचिन पायलट यांनी पंतप्रधानांनी या प्रकरणी स्वत: उत्तर द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. जनता दल (यू)चे प्रवक्ते के. सी. त्यागी, भाकपचे नेते डी. राजा, माकपच्या वृंदा करात यांनीही पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाची मागणी केली. स्वराज यांनी राजीनामा न दिल्यास पंतप्रधानांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, असे ‘आप’ चे प्रवक्ते आशुतोष म्हणाले.
मोदींबाबतचा वाद
वादग्रस्त ठरलेले ललित मोदी यांचा पासपोर्ट तत्कालीन संपुआ सरकारने २०११ साली रद्द केला होता. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तो बहाल केला. आपण काही चुकीचे केले नसून, जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे देश सोडल्याचे मोदींनी म्हटले होते. तथापि, संपुआ सरकारने ब्रिटन सरकारला एक पत्र पाठवून, तुम्ही मोदी यांना प्रवासाची कागदपत्रे दिल्यास भारत- ब्रिटन यांचे द्विपक्षीय संबंध बिघडतील, असे कळवल्यामुळे ब्रिटिश सरकारवर र्निबध होता. ही कागदपत्रे दिल्यास आपले संबंध बिघडणार नाहीत, असे सुषमा स्वराज यांनी ब्रिटिश उच्चायुक्तांशी बोलताना स्पष्ट केले.