बंगळूरु : सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने कोलमडून पडलेले बंगळूरु शहरातील जनजीवन मंगळवारी पूर्वपदावर येऊ शकले नाही. येथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. या स्थितीसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या कथित कुप्रशासनाला तसेच नियोजनशून्यतेला जबाबदार धरले असून त्यावर काँग्रेसनेही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मंगळवारी शहरात पुन्हा पाऊस झाल्याने पूरस्थितीत भर पडली. देशाची आयटी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात जागोजागी बंद पडलेल्या मोटारसायकल ढकलीत निघालेले स्वार आणि गुडघ्याइतक्या पाण्यातून रस्ता कापणारे पादचारी असे दृश्य मंगळवारीही जागोजागी दिसत होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, शहराच्या दोनच भागांत अशी स्थिती असून संपूर्ण शहर पाण्याखाली गेल्याचे दृश्य रंगविले जात आहे. अभूतपूर्व पाऊस आणि धरणांतून वाहणारे पाणी यामुळे शहरात ही स्थिती उद्भवली, असा दावाही त्यांनी केला. गेल्या ९० वर्षांत बंगळूरुत असा पाऊस झाला नाही. सर्व तलाव भरले असून त्यातील काही वाहत आहेत. जवळपास प्रत्येक दिवशीच पाऊस होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सर्व प्रमुख आस्थापना या सखल भागात आहेत, शिवाय अतिक्रमणांमुळेही पाणी तुंबले आहे, अशी कारणे त्यांनी दिली. आधीच्या काँग्रेस सरकारने जलाशयांच्या भागात जागा मिळेल तेथे तसेच बफर झोनमध्येही बांधकामांना परवानगी दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

Gold coins uk
किचनचे नुतनीकरण करताना मिळालं घबाड; १७ व्या शतकातील नाण्यांच्या लिलावातून मिळाले लाखो रुपये
stop manipur violence
‘मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन’, अमेरिकेच्या टिप्पणीनंतर भारताची रोखठोक प्रतिक्रिया
Congress flag
ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश
PM Narendra Modi
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर गंभीर आरोप; म्हणाले, “इंदिरा गांधींची संपत्ती मिळवण्यासाठी…”

जमत नसेल तर निवडणूक घ्या- शिवकुमार 

काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी बोम्मई यांना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, त्यांच्या सरकारला काम करणे जमत नसेल, तर त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे. बंगळूरुतील पूरस्थितीला भाजपचे भ्रष्ट सरकार आणि अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. आधीच्या काँग्रेस राजवटीत अतिक्रमणे झाली असतील, तर ती आता त्यांनी (भाजपने) दूर करावीत. सत्ता मिळाल्यावर काम न करता आधीच्या सरकारला दोष देणे योग्य नाही. काँग्रेसच्या काळात अशी स्थिती कधीही उद्भवली नव्हती, असा दावा शिवकुमार यांनी केला.