इथिओपियन एअरलाइन्सकडून बोईंग ७३७ विमाने सेवेतून माघारी

विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला हे अजून समजलेले नाही.

(संग्रहित छायाचित्र)

इथिओपियन एअरलाइन्सचे बोईंग ७३७ मॅक्स ८ विमान कोसळल्याने आता या प्रकारची सर्व विमाने सेवेतून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अपघातात १५७ जण ठार झाले होते त्यात चार भारतीयांचा समावेश आहे.

एअरलाइन्सने म्हटले आहे की, इटी ३०२ या उड्डाणातील बोईंग विमानास अपघात झाल्याने या प्रकारची सर्व विमाने कालपासूनच सेवेतून काढून घेण्यात आली आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत ही विमाने वापरात येणार नाहीत. अपघाताचे कारण अजून समजलेले नाही पण तरीही खबरदारीचा उपाय म्हणून ही विमाने आम्ही  सेवेतून काढून घेत आहोत.

आदिसअबाबा येथून नैरोबीला जाणारे बोईंग विमान उड्डाणानंतर सहा मिनिटात कोसळून १५७ जण ठार झाले होते. हे विमान बिशोफ्तू शहराच्या जवळ असलेल्या टुलू फारा या खेडय़ात एका शेतामध्ये कोसळले. यात मरण पावलेल्यांमध्ये उद्योग व्यावसायिक, संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी यांचा समावेश आहे.

इथिओपियाच्या विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला

इथिओपियन एअरलाइन्सच्या रविवारी अपघातग्रस्त झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून त्याची तपासणी करून अपघातांची कारणे स्पष्ट होणार आहेत.

विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला हे अजून समजलेले नाही. रविवारी जेथून विमान उडाले त्या आदिसअबाबा येथे हवामान स्वच्छ होते. या अपघातानंतर इथिओपियाने बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानांचा वापर तूर्त बंद करण्याचे ठरवले आहे. या अपघातात १५७ जण मरण  पावले असून इथिओपियन एअरलाइन्सकडे असलेल्या आणखी ४ बोईंग विमानांची सेवा बंद करण्यात आली आहे, असे प्रवक्ते असरत  बेगाशॉ यांनी सांगितले. इथिओपियाकडे एकूण ५ विमाने होती त्यातले एक रविवारी कोसळले अजून २५ विमाने आधीच मागवण्यात आली आहेत.

रेड क्रॉसने मदत कार्य सुरू केले असून अपघाताच्या ठिकाणी एक फाटके पुस्तक, बिझीनेस कार्ड, विमानाचे तुकडे सापडले आहेत. दरम्यान इस्रायलचे तज्ज्ञ येथे तपासासाठी आले आहेत. त्यात अमेरिका, केनिया व इतर देशही मदत करीत आहेत. या अपघातात ३५ देशांचे लोक मरण पावले होते. त्यात केनियाच्या ३२ जणांचा समावेश होता त्यांच्यापैकी २५ जणांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला आहे. वैमानिकाने धोक्याबाबत संपर्क साधला होता व परत येण्याची परवानगी मागितली होती, पण हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला व नंतर विमान कोसळल्याचीच वार्ता आली.

चीनमध्येही तूर्त बोईंग विमानांचा वापर बंद

इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग विमानाला अपघात झाल्यानंतर चीननेही बोईंग ७३७ मॅक्स ८ विमाने व्यावसायिक सेवेतून काढून घेतली आहेत. इंडोनेशियातील अपघातानंतर बोईंग विमानाला काल दुसरा भीषण अपघात झाला त्यात १५७ जण ठार झाले आहेत. दोन्ही अपघातात साम्य असल्याचे सांगून चीनच्या हवाई वाहतूक प्रशासनाने म्हटले आहे की, देशांतर्गत विमान कंपनीने सायंकाळी  सहापासून बोईंग ७३७ मॅक्स ८ विमाने सेवेतून वगळली आहेत. उड्डाण सुरक्षा अभ्यासानंतरच या विमानांची उड्डाणे परत सुरू होतील. चीनमधील हवाई वाहतूक प्रशासन या विमानाच्या सुरक्षेबाबत अमेरिकी हवाई प्रशासन व बोईंग कंपनी यांच्याशी संपर्क साधणार आहे.

इथिओपियन एअरलाइन्सचे विमान नैरोबीकडे जाण्यासाठी उडाले असताना सहा मिनिटात ते कोसळले होते त्यात सर्व प्रवासी ठार झाले. त्यात चीनमधील आठजणांचा समावेश होता. रविवारी सकाळी हा अपघात झाला होता. चीन ही अमेरिकेच्या बोईंग कंपनीची मोठी बाजारपेठ असून बोईंग ७३७ मॅक्स प्रकारातील किमान एक पंचमांश विमाने ही चीनला विकली गेली आहेत. कंपनीने चीनला अशी ७६ विमाने दिली असून आणखी १०४ विमानांची मागणी नोंदवण्यात आली आहे. बोईंग व कमर्शियल एअरक्राफ्ट कार्पोरेशन ऑफ चायना यांचा चीनमधील झोशान या शहरात संयुक्त प्रकल्प असून तेथे या विमानांचे आतले भाग तयार होतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Boeing 737 flights from ethiopian airlines withdraw from service