केंद्रीय आणि राज्य सरकारी वैद्याकीय महाविद्यालयांना बळकटी देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने जागा वाढवण्यास मंजुरी दिली. पदवी आणि वैद्याकीय शिक्षणासाठी ५,००० जागा वाढवण्यासाठी योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला मान्यता देण्यात आली.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, विद्यामान सरकारी वैद्याकीय महाविद्यालयांच्या अपग्रेडेशनसाठी ५,०२३ एमबीबीएस जागा वाढवण्यासाठी केंद्रीय योजनेचा विस्तार करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी प्रति जागा १.५० कोटी रुपये खर्च येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने १५ व्या वित्त आयोगाच्या २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीसाठी २,२७७.३९७ कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह वैज्ञानिक आणि औद्याोगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) ‘क्षमता बांधणी आणि मानव संसाधन विकासासाठी (सीबीएचआरडी) २,२७७ कोटींच्या निधीला मान्यता दिली.
रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस
मंत्रिमंडळ समितीने १०.९ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका उत्पादकतेशी संबंधित बोनस देण्यास मान्यता दिली आहे, अशी घोषणा वैष्णव यांनी केली.
जहाजबांधणीसाठी ६९,७२५ कोटींचा निधी
देशाची सागरी शक्ती पुन्हा मिळवण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी भारताच्या जहाजबांधणीचे पुनरुज्जीवन आणि परदेशी जहाजांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ६९,७२५ कोटी रुपयांच्या आर्थिक निधीला मान्यता दिली.