scorecardresearch

VIDEO: पोलिसांना रोखण्यासाठी तस्करांनी धावत्या ट्रकमधून रस्त्यावर फेकल्या गाई; २२ किमीपर्यंत सुरु होता थरार, नंतर…

गुरुग्राममध्ये रंगला रात्रीचा थरार, पोलिसांनी गाई तस्करांचा पाठलाग

नवी दिल्लीत पोलिसांनी गुरांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. २२ किमी पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी गुरुग्रामजवळून या पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ट्रकचा टायर फुटलेला असतानाही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. धक्कादायक म्हणजे गोरक्षक आणि पोलिसांना रोखण्यासाठी तस्करांनी वेगाने धावत असलेल्या ट्रकमधून गाई खाली फेकत अडथळा निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला. घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

संपूर्ण शहरात हा पाठलाग सुरु होता, पोलिसांनी तस्करांना अटक केली असून त्यांच्याकडून गावठी पिस्तूलं आणि काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिल्ली सीमेवरुन गुरुग्राममध्ये प्रवेश करत असताना थांबण्यास सांगितलं असता त्यांनी वाहनाचा वेग वाढवला आणि त्यानंतर पाठलाग सुरु केला. गोरक्षकांनी वाहनाचा ट्रक पंक्चर केल्यानंतरही तस्कर वेगाने गाडी चालवत होते.

२२ किमीपर्यंत पाठलाग सुरु असताना तस्करांनी धावत्या वाहनातून गाईंना खाली फेकलं जेणेकरुन मागील वाहनांना अडथळा निर्माण होईल. गोरक्षकाने एनडीटीव्हीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “२२ किमी पाठलाग केल्यानंतर या तस्करांना पकडण्यात आलं. त्यांच्या वाहनातून बेकायदेशीर पिस्तूलं आणि जिवंत काडतुसं सापडली आहेत. सर्व गाईंना खाली फेकल्यानंतर हे तस्कर हात जोडून उभे होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे”.

हरियाणा सरकारने गाईंची तस्करी कऱणाऱ्यांविरोधात कडक नियम केले असून त्यांच्या सुरक्षेसाठी आयोगही नेमला आहे. मात्र त्यानंतरही तस्करीच्या घटना मात्र वाढतच आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cattle smugglers threw cows from running truck to stop the police from chasing them in gurugram sgy

ताज्या बातम्या