Fraud News : कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चार्टर्ड अकाउंटंटला त्यांच्या स्वत:च्या गाडीवर ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीने तब्बल १.५ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे बेंगळुरूमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित ड्रायव्हरला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

बेंगळुरूमधील एका चार्टर्ड अकाउंटंटकडे एक व्यक्ती गेल्या १० वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून काम करायचा. मात्र, त्याने नुकतीच १.५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. झालं असं की, एक दिवस चार्टर्ड अकाउंटंट असणाऱ्या व्यक्तीने ड्रायव्हरकडे १.५ कोटी रुपयांची बॅग गाडीत ठेवण्यासाठी दिली. तसेच ही बॅग पैशाची असून सुरक्षितपणे ठेवण्यास सांगितलं. या बॅगेतील रक्कम बँकेत जमा करायची असल्याचंही सांगितलं. मात्र, त्यानंतर ड्रायव्हरने तब्बल १.५ कोटी रुपये घेऊन फरार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा चार्टर्ड अकाउंटंटकडे काम करत होता. या ४५ वर्षीय ड्रायव्हर व्यक्तीकडे त्याच्या मालकाने १.५१ कोटी रुपये सोपवले होते. मात्र, हे पैसे घेऊन तो फरार झाल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत अशी माहिती समोर आली की ड्रायव्हरने १.५ कोटी रुपयांची मोठी रक्कम मंदिराच्या दानपेटीत टाकली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव राजेश बी एन असं असून तो बेंगळुरूमधील रहिवासी आहे. तो बेंगळुरू शहरातील कोडंडररामपुरा येथे एका चार्टर्ड अकाउंटंटकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा.५ मे रोजी चार्टर्ड अकाउंटंटने राजेशला १.५१ कोटी रुपये असलेली बॅग दिली होती. ती बॅग गाडीत सुरक्षितपणे ठेवण्यास सांगत ही रक्कम बँकेत जमा करायची असल्याचं सांगितलं.

दरम्यान, जेव्हा चार्टर्ड अकाउंटंटला बँकेत पैसे जमा करण्यासाठी जायचं असतं तेव्हा राजेश म्हणजेच ड्रायव्हर आणि गाडी दोघेही गायब झालेले पाहून चार्टर्ड अकाउंटंटला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या पत्त्यावर धाव घेतली असता तेथे फक्त त्यांची गाडी उभा असलेली आढळून आली. त्यानंतर ड्रायव्हरला फोन केला असता ड्रायव्हरने आपण औषध खरेदीसाठी बाहेर आल्याचं सांगितलं. त्यानंतर पुन्हा त्याच्याशी संपर्क केला असात संपर्क होऊ शकला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंटने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी राजेशचा शोध घेत त्याला अटक केली. तेव्हा पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी सांगितलं की, राजेश ९ मे रोजी गायब झाला होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चौकशी दरम्यान पोलिसांना कळलं की राजेशने त्याच्या कुटुंबासाठी १ लाख रुपये खर्च केले होते. तसेच त्याने एका मंदिराच्या दानपेटीत मोठी रक्कम टाकली होती.