तेलगी घोटाळ्यातील आमदाराकडून भाजपचे समर्थन
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडल्यावर कर्नाटकातील काँग्रेस-जनता दल आघाडीचे सरकार गडगडणार अशी चर्चा सुरू झाली असतानाच काँग्रेसचे एक बडे प्रस्थ रोशन बेग यांनी पक्षनेतृत्वाच्या विरोधात बंडाची भूमिका घेत काँग्रेसला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहे. वेळप्रसंगी मुस्लिमांनी भाजपबरोबर जुळवून घ्यावे, असे आवाहन करीत बेग यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे सूचित केले आहे.
बंगळूरुमधील शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार रोशन बेग हे कर्नाटक काँग्रेसमधील बडे प्रस्थ मानले जाते. गेल्या वर्षी काँग्रेस-जनता दलाचे (से) सरकार सत्तेत आल्यावर बेग यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली नव्हती. यावरून बेग हे काँग्रेस नेतृत्वावर नाराज होते. रोशन बेग यांचे नाव वादग्रस्त तेलगी घोटाळ्याशी जोडले गेले होते. त्यांचे बंधू रेहान बेग यांना तेलगी घोटाळ्यात अटकही झाली होती. भावाच्या अटकेनंतर काँग्रेस नेतृत्वाने रोशन बेग यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते. २००२ मध्ये राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात शिवसेना-भाजपने मांडलेल्या अविश्वास ठरावाच्या वेळी आघाडीच्या आमदारांना बंगळूरुमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले होते. तेव्हा सारी व्यवस्था ही रोशन बेग यांनी केली होती, असा आरोप झाला होता.
कर्नाटकातील काँग्रेस-जनता दल आघाडीचे सरकार लवकरच पडेल, अशी चर्चा भाजपने सुरू केली आहे. यावरून मुख्यमंत्री कुमारस्वामी सावध झाले आहेत. रोशन बेग यांनी विधिमंडळ पक्षनेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव यांच्यावर आरोप करीत काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले. बेग हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काँग्रेसवर टीका करताना बेग यांनी भाजपला साथ द्यावी, असे आवाहन मुस्लीम समाजाला केले आहे.
बेग यांना पक्षाची नोटीस
- पक्षाचे संघटन सरचिटणीस वेळूगोपाळ, विधिमंडळ नेते सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव यांच्यावर टीका केल्याबद्दल काँग्रेस पक्षाने रोशन बेग यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.
- पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी विचारणाही पक्षाने केली आहे. बेग यांनी ज्या पद्धतीने पक्षाचे सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ नेते या साऱ्यांना लक्ष्य केले यावरून ते पक्ष सोडतील, असे मानले जाते.
- बेग यांनी पक्षाच्या नेत्यांवर केलेले आरोप हे सत्य आहेत, असे सांगत काँग्रेसचा मित्र पक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ यांनी बेग यांचे अभिनंदन केले आहे.
- काँग्रेस आणि जनता दलाचे संबंध गेले काही दिवस ताणले गेले असून, यातूनच जनता दलाच्या प्रदेशाध्यक्षाने काँग्रेसवर कुरघोडी केली आहे.