scorecardresearch

काँग्रेस पक्षाला इतिहास आहे फक्त भूगोल राहिलेला नाही – संजय राऊत

उत्तर प्रदेशातील निकाल पाहता काँग्रेस पक्षाने देशामध्ये ताकद वाढवली पाहिजे असे संजय राऊत म्हणाले

Congress party has a history not just geography says Sanjay Raut

देशातील सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेस हा कांदबरीपुरताच राहिलाय. या पक्षाला इतिहास आहे पण, भूगोल राहिलेला नाही, अशी टिका करत काँग्रेसने त्यांचा भूगोल वाढविण्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. शिवसेनेच्या शाखेत नागरिक उत्स्फूर्तपणे येतात तर, संघाच्या शाखेत चिकाटीने काम करणारी माणसे हेरून आणली जातात, असे भाष्यही त्यांनी यावेळी केले.

ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये शुक्रवारी सायंकाळी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णीक यांच्या प्राप्तकाल या कादंबरीचा प्रकाशन ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते झाले. कोकण मराठी साहित्य परिषद, आनंद विश्व गुरुकूल महाविद्यालय आणि मॅजेस्टिक प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमादरम्यान परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाच्या कार्यक्रमाला शिवसेना नेते संजय राऊत हे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेसवर टिका केली.

 “काँग्रेस पक्षाला इतिहास आहे फक्त भूगोल राहिलेला नाही. काँग्रेसने भूगोल वाढवला पाहिजे. उत्तर प्रदेशातील निकाल पाहता काँग्रेस पक्षाने देशामध्ये ताकद वाढवली तरच २०२४ मध्ये समर्थ पर्याय उभा राहू शकतो,” असे संजय राऊत यांनी म्हटले.

देशात दोनच शाखा आहेत. त्यापैकी एक शिवसेनेची तर दुसरी संघाची आहे. शिवसेनेच्या शाखेत नागरिक उत्स्फूर्तपणे येतात तर, संघाच्या शाखेत चिकाटीने काम करणारी माणसे हेरून आणली जातात, असे त्यांनी यावेळी सांगितले. मध्यवर्गीय माणसाच्या मनाच्या अस्वस्थतेचे प्रतिबंब प्राप्तकाल या कादंबरीत उमटविण्यात आले आहे. मध्यवर्गी हाच खरा राजकारणाचा आधार असून या वर्गामुळेच देशात लोकशाही टिकून आहे, असेही ते म्हणाले. महापालिका तसेच लोकसभा निवडणुका भारतीय जनता पक्षाला सध्या निवडणुका सोप्या नाहीत आणि त्याची जाणीव या पक्षातील नेत्यांना असल्याचे त्यांनी म्हटले. प्राप्तकाल या कादंबरीच्या रुपाने मराठी साहित्यात आधुनिकोत्तर साहित्य येऊ पाहत आहे, असे भारत सासणे यांनी सांगितले.

हिंदू धर्म आणि हिंदूत्व या दोन भिन्न गोष्टी आहेत. देशातील प्रत्येक धर्मामध्ये एक अप्रवृत्ती असून अशा प्रवृत्तींवर प्रहार करून माणसांनी सामंजस्यांनी राहिले पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी दिला. या देशात केवळ १५ टक्के मुस्लिम बांधव आहेत. तरिही त्यांच्यापासून हिंदूंना असुरक्षिता का वाटते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress party has a history not just geography says sanjay raut abn

ताज्या बातम्या