Parenting Cost In India: मुंबईतील एक कंपनीचे माजी संस्थापक अंकुर झवेरी यांनी लिंक्डइनवर मुलांच्या शिक्षणाच्या वाढत्या खर्चावर एक पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून, यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या पोस्टमध्ये अंकुर झवेरी यांनी मुलांचे उत्तम संगोपन करण्यासाठी किती खर्च येतो, याची खरी जाणीव इंटरनॅशन स्कूलमध्ये शिक्षक असलेल्या त्यांच्या चुलतभावाशी चर्चा केल्यानंतर झाल्याचे सांगितले आहे.

या पोस्टमध्ये झवेरी यांनी नमूद केलेल्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी होणाऱ्या वार्षिक खर्चावर अनेकांनी सहमती दर्शवली आहे. तर काहींनी असहमती दर्शवत, हे आकडे पालकांच्या ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट’ (FOMO) या मानसिकतेतून आलेले असल्याचे ठामपणे म्हटले आहे. तसेच काहींनी यावर चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

एका मुलाच्या शिक्षणासाठी वार्षिक १३ लाख रुपये खर्च

अंकुर झवेरी यांच्या पोस्टनुसार, एखाद्या सामान्य इंटरनॅशन स्कूलमधील शिक्षण शुल्क दरवर्षी ७ ते ९ लाख रुपयांच्या दरम्यान असते. ही तर फक्त सुरुवात आहे. याव्यतिरिक्त गणवेश, पुस्तके, खाजगी शिकवण्या आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी आणखी २ ते ४ लाख रुपयांचाही समावेश आहे. एक मुलाच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या वार्षिक १२ लाख रुपयांव्यतिरिक्त वाढदिवसाच्या पार्टी, कपडे, कोचिंग क्लासेस आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर गोष्टींचा विचार केला तर ही रक्कम १३ लाख रुपयांच्या पुढे जाते.

…तर वर्षाला ५५ लाख रुपये कमवावे लागतील

लिंक्डइनवरील या पोस्टमध्ये अंकुर झवेरी, हा खर्च परवडण्यासाठी तुम्हाला किती कमाई करावी लागेल? असा प्रश्न विचारला आहे. याला त्यांनी उत्तरही दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “जर तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या सुमारे ३०% खर्च तुमच्या मुलावर करायचा असेल, तर तुमचे निव्वळ उत्पन्न दरवर्षी किमान ४४ लाख रुपये असले पाहिजे आणि कर व एका मुलासाठी ही जीवनशैली टिकवण्यासाठी तुमचा एकूण पगार आदर्शपणे ५५ लाख रुपये वार्षिक असायला पाहिजे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याला काही युजर्सनी पाठिंबा दिला आहे. तर काही युजर्सनी विरोध केला आणि असा युक्तिवाद केला की, आयसीएसई किंवा राज्य मंडळाच्या शाळा खूप कमी शुल्क आकारतात. परंतु झवेरी यांनी स्पष्ट केले की, बहुतेक शहरी पालक विशेषतः लिंक्डइनवर असलेले त्यांच्या मुलांसाठी सर्वोत्तम गोष्टींची आकांक्षा बाळगतात.