Covid 19: देशात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या वाढल्याने चिंतेत भर; करोना मृतांच्या संख्येत मात्र घट

करोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे

COVID-19 Update in India, Coronavirus Update
अमेरिका, ब्राझीलनंतर जगात सर्वाधिक मृत्यू भारतात आहेत

देशातील करोनाच्या प्रसाराचा वेग मंदावत असताना सलग चौथ्या दिवशी ५० हजारांहून कमी नवीन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून नवीन प्रकरणांमध्ये बाधितांमध्ये थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत करोनाच्या ४८ हजार ७८६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी हा आकडा ४५ हजार ९५१ होता. तर बुधवारी दिवसभरात १००५ करोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर आता करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्याही ५ लाख २३ हजार २५७ वर आली आहे. देशातील एकूण बाधितांपैकी ही संख्या १.७२ टक्के आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात ६१,५८८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे बुधवारी १३,८०७ सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. देशात सलग ४९ व्या दिवशी नविन करोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ३० जूनपर्यंत देशभरात करोना लसीचे ३३ कोटी ५७ लाख डोस देण्यात आले आहेत. बुधवारी ही संख्या २७.६० लाख इतकी होती. त्याचबरोबर आतापर्यंत ४१ कोटी करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. बुधवारी सुमारे १९ लाख करोना नमुना चाचण्या घेण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर ३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

देशात आतापर्यंत ३ कोटी ४ लाख ११ हजार ६३४ लोकांना करोनी लागण झाली आहे. त्यापैकी २ कोटी ९४ लाख ८८ हजार ९१८ जणांनी करोनावर मात केली आहे. तर ३ लाख ९९ हजार ४५९ रुग्णांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या देशात ५ लाख, २३ हजार २५७ सक्रिय रुग्ण आहेत.

देशातील करोना मृत्यूचे प्रमाण हे १.३१ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. सक्रिय रुग्ण हे २ टक्क्यांपेक्षा कमी आहेत. करोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. संसर्ग झालेल्या एकूण संख्येच्या बाबतीतही भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर अमेरिका, ब्राझीलनंतर जगात सर्वाधिक मृत्यू भारतात आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Covid 19 increase in patient numbers for second day in a row in the country in the last 24 hours 48786 new patients were found abn