करोनाच्या दुसऱ्या लाटेत गुजरातमध्ये आरोग्य व्यवस्थेची दाणादाण उडाल्यासारखीच परिस्थिती आहे. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारने सारवासारव केली. मात्र, एका गुजराती दैनिकाने केलेल्या मृत्यूंच्या पडताळणीतून हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये दिवसाला १,७४४ लोकांचा मृत्यू होत असून, अवघ्या ७१ दिवसात १ लाख २३ हजारांहून अधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून इतके मृत्यूप्रमाणपत्र वाटण्यात आले असले, तरी राज्यात ४ हजार २१८ मृत्यू झाले असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
‘दैनिक भास्कर’च्या गुजराती दैनिकाने गुजरातमधील मृतांच्या आकडेवारीबद्दल विशेष वृत्त प्रसिद्ध केलं आहे. १ मार्च २०२१ ते १० मे २०२१ या कालावधी राज्यात वाटप करण्यात आलेल्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आकडेवारीची पडताळणी करण्यात आली. यातून डोळे विस्फारुन टाकणारी माहिती उजेडात आली आहे. ३३ जिल्हे आणि ८ महापालिकांद्वारे ७१ दिवसांमध्ये १ लाख २३ हजार ८७१ मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तर विरोधाभास म्हणजे राज्यात केवळ ४ हजार २१८ जणांचाच करोनामुळे मृत्यू झाल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. त्यामुळे गुजरातमध्ये ७१ दिवसात सव्वा लाख लोकांचा मृत्यू कशामुळे झाला, असा प्रश्न आता उभा राहिला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट मृत्यू
मृत्यू प्रमाणपत्रांची तुलना केली, तर यावर्षी मार्च महिन्यात राज्यात २६,०२६, एप्रिलमध्ये ५७,७९६ आणि मे महिन्याच्या सुरूवातीच्या दहा दिवसात ४०,०५१ मृत्यू झाले आहेत. २०२० मधील आकडेवारीशी याची तुलना केली असता मार्च २०२० मध्ये २३,३५२, एप्रिलमध्ये २१ हजार,५९१ आणि मे महिन्यात १३,१२५ मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. यातून हेच दिसून आहे की, गेल्या वर्षीच्या तुलने यंदा मृत्यूंची संख्या दुप्पट झाली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला निशाणा
या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. “हे भयंकर आहे! ७१ दिवसांत १.२३ लाख मृत्यू. दररोज १७,४४ मृत्यू. गुजरात मॉडेल नेहमीच माहिती लपवून ठेवत आणि अहवालात छेडछाड करण्याचंच काम करते,” असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं आहे.
This is terrible!! 1.23 lakh deaths in 71 days, that’s 1744 deaths per day. The much hyped Gujarat model always worked with concealing the data and fudging reports. pic.twitter.com/lsddhw0sCW
— Prithviraj Chavan (@prithvrj) May 14, 2021
पाच शहरांत ४५ हजार २११ मृत्यू
गुजरातमधील महत्त्वाच्या पाच शहरांमध्ये ४५ हजार २११ मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ७१ दिवसांच्या कालावधीत या शहरांमध्ये ४५ हजार मृत्यूप्रमाण दिली गेली. यात अहमदाबादमध्ये १३ हजार ५९३ मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ सुरतमध्ये ८ हजार ८५१, राजकोट १० हजार ८८७, वडोदरा ७ हजार ७२२ मृत्यू प्रमाणपत्र दिली गेली. तर सरकारच्या आकडेवारीनुसार या शहरात झालेले मृत्यू असे आहेत. अहमदाबाद २ हजार १२६, सूरत १ हजार ७४, राजकोट २८८, वडोदरा १८९.