ऋषिकेश बामणे

विश्वचषकाचा महासंग्राम आता उपांत्य फेरीच्या वळणावर येऊन ठेपला आहे. यंदाच्या विश्वचषकातही चाहत्यांना कायमस्वरूपी लक्षात राहतील, अशा अनेक गोष्टी घडल्या. परंतु त्यातही बळी मिळवल्यानंतर अथवा शतक ठोकल्यानंतर काही खेळाडूंची आनंद साजरा करण्याची भिन्न शैली सर्वात उठावदार ठरली. अशाच काही नव्या-जुन्या सेलिब्रेशन्सचा हा धांडोळा.

कॉट्रेलच्या ‘सलामी’ला सलाम

वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलला विश्वचषकापूर्वी फारसे क्रीडाप्रेमी ओळखतही नव्हते. परंतु या विश्वचषकातील विंडीजच्या पहिल्याच सामन्यात कॉट्रेलने पाकिस्तानच्या इमाम उल हकला माघारी पाठवून वैशिष्टय़पूर्ण सलामी दिल्याने त्याच्या या शैलीविषयी चाहत्यांमध्ये फार चर्चा रंगली. क्रिकेटपटूव्यतिरिक्त विंडीजच्या सैन्यातही भरती असलेला कॉट्रेल देशाच्या रक्षकांनाच मानवंदना देण्यासाठी अशाप्रकारे कडक सलामी देतो. त्याशिवाय क्रिकेटकडे वळण्यापूर्वी त्याने सहा महिने सैन्याचे शिक्षणही घेतले आहे. मात्र यापूर्वी विंडीजच्याच मार्लन सॅम्युअल्सनेसुद्धा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात फलंदाजाला बाद केल्यावर सलामी दिली होती, परंतु त्याचे सलामीमागील उद्दिष्ट हे वेगळे होते.

शमीच्या सलामीला कॉट्रेलचे प्रत्युत्तर

भारताविरुद्धच्या सामन्यात कॉट्रेलने मोहम्मद शमीला बाद केल्यानंतर पुन्हा नेहमीच्या शैलीत सलामी दिली. परंतु विंडीजच्या फलंदाजीच्यावेळी कॉट्रेल बाद झाल्यानंतर शमीनेही गंमत म्हणून कॉट्रेलला त्याच्याच शैलीतील सलामीची नक्कल करत डिवचले. यावर कॉट्रेलने मात्र इतरांची नक्कल करणे सोपे असून त्यापेक्षा स्वत:ची वेगळी ओळख बनवा, अशा शैलीत शमीला प्रत्युत्तर दिले.

उडता वॉर्नर

शतक झळकावल्यानंतर हवेत सूर मारून एका हाताने हेल्मेट उंचावणाऱ्या वॉर्नरचे सेलिब्रेशनही निराळेच आहे. ‘टोयोटा जम्प’ असे त्याच्या शैलीला नाव देण्यात आले असून यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावल्यानंतर वॉर्नरने हे सेलिब्रेशन आपण एका हेतूने करत असल्याचे सांगितले. मार्च २०१८ मध्ये चेंडू फेरफार केल्यामुळे वॉर्नरवर वर्षभरासाठी निलंबन घालण्यात आले होते. परंतु आता त्याने झोकात पुनरागमन केले असून ‘बॉर्न अगेन टू रुल’ म्हणजेच जन्मलोय पुन्हा राज्य करण्यासाठी या उद्देशाने आपण हवेत झेप घेत असल्याचे वॉर्नरने स्वत: सांगितले.

ताहीरचे वेगेवेगे धावू..

यंदाच्या वर्षांतील सर्वाधिक वयस्कर खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर. बाद झालेला फलंदाज कोणीही असो, पण तितक्याच उत्साहाने संपूर्ण मैदानभर दोन्ही हात उंचावून फेरी मारत आनंद साजरा करणाऱ्या ४० वर्षीय ताहीरचे सर्वच चाहते आहेत. ‘‘कधी-कधी आपण आयुष्यातील लहान क्षणांचा आनंद घेण्यास विसरतो, त्यामुळे माझी आनंद साजरा करण्याची शैली त्याचेच प्रतीक आहे. त्यातही समोरचा फलंदाज अव्वल दर्जाचा असला की मला सेलिब्रेशन करण्यात अधिक मजा येते. त्यामुळे मलाच प्रेरणा मिळते,’’ असे ताहीरने काही वर्षांपूर्वी सांगितले होते. समोर कोणताही संघ असला तरी ताहीर हमखास बळी मिळवून देतो. त्यामुळे त्याचा जोश व जिद्द एखाद्या पंचविशीतील गोलंदाजालाही लाजवेल.

असेही काही सेलिब्रेशन्स..

भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाची तलवारबाजी, ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीचे ‘चेनसॉ’, तबरेझ शम्सीचे तोंडावर रुमाल बांधून, ड्वेन ब्राव्होचे चॅम्पियन नृत्य, गेलची गँगनम स्टाइल असे विविध प्रकारचे सेलिब्रेशन चाहत्यांनी आजवर पाहिले आहेत. काहींना या सेलिब्रेशनचे प्रत्युत्तरही मिळाले आहे. २०१७च्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये जमैका थलायव्हासच्या केस्रिक विल्यम्सने चॅडविक वॉल्टनला बाद केल्यानंतर नेहमीच्या शैलीत त्याचे नाव वहीत लिहून त्याच्यापुढे टिक केले. परंतु पुढच्या लढतीत उभय संघ पुन्हा आमनेसामने आल्यावर वॉल्टनने विल्यम्सला चार चौकार लगावून गयाना वॉरियर्सला सामना जिंकवला व विल्यम्सच्याच शैलीत वहीत त्याचे नाव लिहून पुढे टिक करून त्याला चोख प्रत्युत्तर दिले. समाजमाध्यमांवर याविषयी बराच काळ चर्चा रंगली होती.