महाराष्ट्राच्या चित्ररथात नारीशक्तीचा जागर आणि साडेतीन शक्तीपीठाचं दर्शन | Republic Day 2023 cultural float of Maharashtra Chitrarath 2023 on occasion of republic day | Loksatta

Republic Day 2023: आदिशक्तीचा उदो उदो; महाराष्ट्राच्या चित्ररथात गाजला नारीशक्ती आणि देवीचा गजर, पाहा Video

Republic Day 2023 Updates: दिल्लीतील पथसंचलनात महाराष्ट्राच्यावतीने “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला.

Republic Day 2023 News Updates
प्रजासत्ताक दिन २०२३ : महाराष्ट्राचा चित्ररथ

74th Republic Day 2023 Parade : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला. यावर्षीच्या पथसंचलनात १७ राज्ये आणि दहा विविध केंद्रीय मंत्रालयांनी मिळून २७ चित्ररथ कर्तव्यपथावर सादर केले.

महाराष्ट्राने यापूर्वी ४० वेळा राजधानी दिल्लीत मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केलेला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यावेळी “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” ही संकल्पना सादर केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील पुरातन मंदिरे आणि महिलांचे कर्तुत्व या गोष्टीला सर्वांच्या समोर आणता येतील, अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली होती.

हे ही वाचा >> लोकशाहीच्या जिवंत खुणांचा उत्सव!

महाराष्ट्र हा संत, देवदेवतांची भूमी आहे. महाराष्ट्रात ज्याप्रकारे अनेक समाजसुधारक होऊन गेली, तशीच महाराष्ट्राला मोठी धार्मिक परंपरा राहिली आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तीपीठे आहेत. तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. या शक्तिपीठांचे दर्शन आज दिल्लीतील पथसंलनात सर्वांना घेता आले.

हे ही वाचा >> विश्लेषण: प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ नेमकं कोण घडवतं? महाराष्ट्राची यंदाची थीम नेमकी काय असणार?

कसा आहे महाराष्ट्राचा चित्ररथ

महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या पुढील दर्शनीय भागात गोंधळी संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती आहे. समोरच्या डाव्या व उजव्या भागास पारंपरिक वाद्य वाजविणारे आराधी, गोंधळी यांच्या प्रतिमा आहेत. त्यामागे शक्तिपीठांची मंदिरे असून त्यात देवींच्या प्रतिमा आहेत. मागच्या बाजूस पोतराज आणि हलगी वाजविणाऱ्या भक्तांची मोठी प्रतिकृती आहे. तर मधल्या जागेत लोककलाकार आराधी, पोतराज हे लोककला सादर करणार आहेत. तर शेवटी मागच्या बाजूस नारी शक्तीचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्रीप्रतिमा दिसत आहे.

हे ही वाचा >> Republic Day 2023 : राज्यपालांचं जनतेला उद्देशून भाषण; म्हणाले, “महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची…!”

या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य संचालनालयाची आहे. ‘शुभ ॲड’ या संस्थेने चित्ररथाला मूर्त स्वरुप देण्याचे काम केले. संगीतकार कौशल इनामदार यांनी चित्ररथात साडेतीन शक्तीपीठांचा महिमा सांगणारे गीत संगीतबद्ध केले आहे. तर प्राची गडकरी यांनी हे गीत लिहिले आहे. ‘व्हिजनरी परफॉर्मिंग कला समूह’, या संस्थेच्या कलाकारांनी या चित्ररथावर नृत्य कला सादर केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 12:04 IST
Next Story
कंगाल पाकिस्तानला भारताचं ‘या’ बैठकीसाठी निमंत्रण, वाचा काय आहे कारण?