दिल्लीमध्ये मंगळवारी एकीकडे प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असताना दुसरीकडे नव्या कृषी कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. ट्रॅक्टर रॅलीच्या निमित्ताने दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बॅरिकेड्स तोडत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. इतकंच नाही तर विरोध करणाऱ्या पोलिसांवर तलवारी उगारण्यात आल्या. या सर्व घडामोडींमुळे दिल्लीत कमालीचा तणाव निर्माण झाला होता. यादरम्यान एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
दिल्लीत प्रवेश केल्यानंतर शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले होते. यावेळी तिथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांवर शेतकऱ्यांनी काठ्यांनी हल्ला केला. एएनआयने शेअर केलेल्या व्हिडीओत जवळपास डझनहून अधिक पोलीस कर्मचारी आणि निमलष्करी दलाचे जवान संतप्त शेतकऱ्यांच्या हल्ल्यातून आपला जीव वाचवण्यासाठी लाल किल्ल्याच्या इमारतीवरुन उड्या मारताना दिसत आहे. जवळपास १५ फुटांच्या भिंतीवरुन उडी मारण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्यात नव्हता. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा- शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप होत असलेला दीप सिद्धू कोण?
व्हिडीओत शेतकरी पोलिसांना काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. शेतकरी आतमध्ये घुसताच पोलिसांना तेथील कठड्यावर चढून आणि नंतर भिंतीवरुन उडी मारताना व्हिडीओत दिसत आहे. यावेळी काही पोलीस कर्मचारी मात्र शेतकऱ्यांसोबत संघर्ष करत होते.
दरम्यान हे सर्व सुरु असताना एक ट्रॅक्टर रेलिंगच्या दिशेने येऊन पोलिसांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
#WATCH | Delhi: Protestors attacked Police at Red Fort, earlier today. #FarmersProtest pic.twitter.com/LRut8z5KSC
— ANI (@ANI) January 26, 2021
आणखी वाचा- दिल्ली ट्रॅक्टर परेड हिंसाचार : ८३ पोलीस कर्मचारी जखमी; चार गुन्हे दाखल
मंगळवारी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या हिंसाचारात दिल्लीचे ८० पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. यामधील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. दुसरीकडे आयकर कार्यालयाच्या ऑफिसजवळ ट्रॅक्टर पलटी झाल्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आठ बसेस आणि १७ खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली असून पोलिसांकडून चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी असामाजिक तत्वांना हिंसेसाठी जबाबदार धरलं आहे. तर संयुक्त किसान मोर्चाने आपला हिंसाचाराशी काही संबंध नसल्याचं सांगत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. हिंसाचारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत निमलष्करी दलाचे अतिरिक्त जवान तैनात करण्याच्या सूचना केल्या आहेत.