दिल्ली क्राईम ब्रॅन्चचं (गुन्हे शाखा) एक पथक शुक्रवारी (२ फेब्रुवारी) सायंकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी धडकल्याचं पाहायला मिळालं. आम आदमी पार्टीच्या आमदारांच्या घोडेबाजाराच्या आरोपांप्रकरणी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त केजरीवाल यांच्या घरी गेले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की, भारतीय जनता पार्टी आपचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने चौकशीला सुरुवात केली आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचे अधिकारी नोटीस देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.

अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की, भाजपा त्यांच्या २१ आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत आहे. याप्रकरणी भाजपाने त्यांच्या सात आमदारांशी संपर्क साधला आहे. दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम आणि शिक्षणमंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता की, भाजपा आम आदमी पार्टीच्या आमदारांना प्रत्येकी २५-२५ कोटी रुपयांची ऑफर देत आहे. २५ कोटी रुपये घ्या आणि भाजपात या अशी थेट ऑफर भाजपाने आपच्या आमदारांना दिली आहे. योग्य वेळी आम्ही त्यांच्या ऑडिओ क्लिप्सदेखील सादर करू.

दरम्यान, याप्रकरणी दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा आतिशी यांच्या घरी नोटीस पाठवू शकते. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचं एक पथक कोणतीही पूर्वकल्पना न देता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालं. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी ही नोटीस घेण्यास तयार होते. परंतु, गुन्हे शाखेचे अधिकारी नोटीस न देताच माघारी परतले.

हे ही वाचा >> “…त्यांच्या गळ्यात गळे घालायला मी फडणवीस नाही”, अंजली दमानियांचा टोला; म्हणाल्या “तुमचं किळसवाणं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केजरीवाल आणि आतिशी यांनी आरोप केले असले तरी भाजपाने या आरोपांचं खंडण केलं आहे. तसेच ज्या आमादारांशी भाजपाने संपर्क साधल्याचा दावा केला जात आहे त्यांची नावं जाहीर करण्याची मागणीदेखील भाजपाने केली आहे. दिल्ली भाजपाचे सचिव हरिश खुराना यांनी आतिशी यांना आव्हान दिलं आहे की, त्यांनी या आमदारांची नावं जाहीर करावी. अन्यथा असले फालतू आरोप करू नयेत. खुराना म्हणाले, असे आरोप करून तुम्ही राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून लोकांचं लक्ष भरकटवत आहात.