बालाकोट एअर स्ट्राइकनंतर खऱ्या मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपाने उग्र राष्ट्रवादावर भर दिल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावला. तुम्ही माझं कुठलंही भाषण ऐका. त्यात जास्त भर विकासाच्या मुद्यावर आहे. पण त्या मुद्द्याची हेडलाइन बनत नाही. अनेक दशकांचा दहशतवाद आणि आपल्या सैनिकांचे मृत्यू हे खरे मुद्दे नाहीत का? असा सवाल करतानाच देशभक्ती हा आजार नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारताच्या मूळ संस्कृतीवर हल्ला करण्यासाठी ज्या प्रमाणे उग्र धर्मनिरपेक्षतेचा शोध लावण्यात आला त्याचप्रमाणे देशभक्तीला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यासाठी उग्र राष्ट्रवादाचा शोध लावला गेला असे मोदी म्हणाले. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विचार मांडले. पुन्हा एकदा जनतेचा आशिर्वाद मिळेल. पूर्ण बहुमताने भाजपाचे सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘चलता है’ या वृत्तीमुळे दीर्घकाळ आपल्या देशाची प्रगती खुंटली. मी या गोष्टीला आव्हान देत आहे असे मोदी म्हणाले.

सपा-बसपा आघाडी भाजपाच्या पुन्हा सत्ता मिळवण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करणार या प्रश्नावर मोदी म्हणाले की, सपा-बसपाकडे कुठलेही व्हिजन नाही. ते लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. सपाने बसपावर लूट आणि भ्रष्टाचारा आरोप केले होते तर बसपाने सपावर गुंडगिरी, खराब प्रशासनाचे आरोप केले होते. दोन्ही पक्षांचा असा इतिहास असताना त्यांची केमिस्ट्री कशी जुळेल? असा सवाल मोदींनी केला.