नवी दिल्ली : मुंबई विमानतळावर व्हीलचेअर उपलब्ध न झाल्यामुळे, ८० वर्षांच्या एका वृद्धाला विमानतळाच्या टर्मिनलवरून पायी चालत जावे लागल्यामुळे तो कोसळल्याची व नंतर मरण पावल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियाला गुरुवारी ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला.

ही घटना १२ फेब्रुवारीला घडली होती. या वृद्ध प्रवाशाला व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात एअर इंडिया अपयशी ठरल्यामुळे या कंपनीला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा

‘याशिवाय, या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध काय कारवाई केली याबाबत एअर इंडियाने माहिती दिली नाही. त्याचप्रमाणे भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी काय सुधारात्मक उपाययोजना केल्या हेही ही कंपनी सांगू शकली नाही’, असे हा अधिकारी म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वृद्धाची पत्नीही व्हीलचेअरवर होती आणि दुसऱ्या व्हीलचेअरसाठी वाट पाहण्याऐवजी पत्नीसोबत चालत जाण्याची इच्छा संबंधित वृद्ध प्रवाशाने व्यक्त केली होती, असे कंपनीने सांगितले होते. ‘प्रवासादरम्यान ज्यांना मदत हवी आहे, त्यांच्यासाठी पुरेशा संख्येत व्हीलचेअर उपलब्ध असतील हे सुनिश्चित करावे अशी सूचना सर्व विमान कंपन्यांना करण्यात आली आहे’, असे डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले.