जम्मू-काश्मीरमध्ये वारंवार होत असलेले दहशतवादी हल्ले आणि शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तपात होत आहे. हा रक्तपात थांबवायचा असेल तर पाकिस्तानशी चर्चा होणे गरजेचे आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी हे आवाहन केले आहे.
https://twitter.com/ANI/status/962991350282182658
महबूबा यांनी म्हटले आहे की, काश्मीरमधला हा रक्तपात थांबवायचा असेल तर पाकिस्तानबरोबर चर्चा होणे गरजेचे आहे. मला माहिती आहे की, आज मला टीव्हीवरील न्यूज अँकरकडून देशद्रोही ठरवले जाईल, मात्र मला फरक पडत नाही. कारण जम्मू-काश्मीरचे लोक हे पीडित आहेत. त्यांचे आणखी नुकसान होता कामा नये, त्यामुळे यावर युद्ध हा उपाय नाही. यासाठी आम्हाला पाकिस्तानशी चर्चाच करावी लागले.
https://twitter.com/ANI/status/962985196487348225
दरम्यान, काश्मीरमधील पाकिस्तानकडून सुरु असलेल्या हिंसाचारावर बोलताना जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. पाकिस्तानचे नाव न घेता ते म्हणाले की, जितका दहशतवाद वाढेल, तितक्या अडचणी वाढतील. यामुळे त्यांच्या देशात अधिक अडचणी निर्माण होतील. तिकडे काहीही राहणार नाही. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर भारताच्या राज्यकर्त्यांनाही विचार करावा लागेल की पुढचे पाऊल काय उचलावे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भेकड हल्ल्यानंतर रविवारी भारतीय सैन्याने सुंजवान लष्करी तळावर क्लिनिंग ऑपरेशन राबवले. येथे आपले ५ जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, काही दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा सीआरपीएफच्या तळावर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत एक सीआरपीएफचा जवान शहीद झाला आहे.