केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जन आशिर्वाद यात्रेदरम्यान मंगळवारी अटक करुन जामीनावर सुटका करण्यात आल्यानंतर आज राणेंनी पत्रकार परिषदेमधून आपली भूमिका मांडली. यावेळी राणेंनी मला कोणीही काहीही करु शकत नाही. मी तुम्हा सर्वांना पुरुन उरलोय असा इशारा विरोधकांना दिला. त्याच प्रमाणे राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या तीन वक्तव्यांचा संदर्भ देत त्या वक्तव्यांच्या वेळी गुन्हे दाखल का करण्यात आले नाहीत असा प्रश्न विचारला. तसेच पत्रकार परिषदेमध्ये राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अटकेनंतर बोलणं झालं का यासंदर्भातील प्रश्नालाही उत्तर दिलं आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तरपणे आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्री, शिवसेनेवर निशाणा साधला. त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. तसेच जन आशिर्वाद यात्रा परवापासून सुरु होत असल्याची घोषणाही राणेंनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये नव्याने सहभागी झालेल्या नेत्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेऊन काम सुरु करण्यास सांगण्यात आल्याचंही राणे म्हणाले. तसेच यावेळेस राणेंनी त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल भाजपाबरोबरच राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.

पत्रकार परिषदेच्या अगदी शेवटी एका पत्रकाराने कालच्या गोंधळासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुमचं कालपासून काही बोलण झालं का असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राणे यांनी, कशाला? मी हे निस्तरण्यास (निपटण्यास) समर्थ आहे. सगळं कसं सुरु आहे म्हटल्यावर व्यवस्थित असंच सांगता येईल. आम्हाला थांबवण्याची हिंमत कोणत्याच पक्षात नाही. सर्व काही सुरळीत सुरु आहे, असं उत्तर दिलं. तसेच पुढे राणेंना जे. पी. नड्डा यांच्याशी बोलणं झालं का असा प्रश्न विचारण्यात आला असता राणे पत्रकार परिषद संपवत असल्याचं सांगत आपल्या खुर्चीवरुन उठले.

काल भाजपाने काय प्रतिक्रिया दिली?

घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन करण्यात आल्याची टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी राणेंना अटक करण्यात आल्यानंतर केली होती. नारायण राणेंना अटक करून घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन करण्यात आलीय. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रांना मिळत असलेल्या मोठय़ा पाठिंब्यामुळे विरोधकांना धक्का बसला आहे. मात्र, अशा कारवायांना भाजप घाबरणार नसून, आम्ही लोकशाही मार्गाने लढू, असे नड्डा यांनी ट्विटरवरुन म्हटलं होतं.