लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कुठल्याही क्षेत्रात मतभिन्नता ही समस्या ठरत नाही. पण, त्या क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांची विचारशून्यता हेच खरे आव्हान असते. काही लोक ना उजव्या विचारांचे असतात, ना डाव्या विचारांचे असतात, ते फक्त संधीसाधू असतात. हा संधीसाधूपणा अत्यंत चिंतेची बाब आहे, असे परखड मत केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘रामनाथ गोयंका एक्सिलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड’ या पुरस्कारांचे वितरण मंगळवारी त्यांच्या हस्ते झाले.

पत्रकारिता क्षेत्रातील या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने विजेत्यांना गौरवण्यात आले. शोध पत्रकारिता, क्रीडा, राजकारण, नागरी समस्या, स्थानिक भाषा, पुस्तके आदी १३ वर्गांतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुद्रित तसेच दृकश्राव्य माध्यमांतील ३७ पत्रकारांना रामनाथ गोएंका फाऊंडेशनच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना गडकरी यांनी देश बदलत असून नवी पिढीच्या आशा-आकांक्षा लक्षात घेऊन पत्रकारिताही बदलत असल्याचे प्रतिपादन केले. नेत्यांनी काय म्हटले वा म्हटले नाही, या लढाईमध्ये जनतेला फारशी रूची नाही. नव्या पिढीला ज्ञाना व विज्ञानाची भूक आहे. नैतिकता, पर्यावरण आणि अर्थकारण या तिन्ही बाबतीत तरुण पिढी अत्यंत जागरुक आहे. त्यामुळे पत्रकार एखाद्या विषयामध्ये सखोल अभ्यास करून लिहितो, तेव्हा त्यांचे लिखाण फक्त वाचवण्यासाठी नसते. त्या लिखाणातून लोकांना नवा दृष्टिकोन मिळतो. संगीत, नाटक, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील सखोल लिखाणांतून जनतेपर्यंत संदेश पोहोचत असतो. त्यातून त्यांचे व्यक्तिगत आयुष्य बदलते. त्यामुळेच रामनाथ गोएंका पुरस्कारासाठी निवडले गेलेले विविध विषय देशासाठी महत्त्वाचे ठरतात, असे गडकरी म्हणाले.

आणखी वाचा- “अक्का, तिहारमध्ये तुमचं स्वागत!”, के.कविता यांच्या अटकेनंतर गँगस्टर सुकेश चंद्रशेखर याचं तुरुंगातूनच पत्र

भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून शासन, प्रशासन, न्यायप्रणाली आणि पत्रकारिता हे तिचे चार आधारस्तंभ आहेत. या क्षेत्रांतील लोकांचे वर्तन व व्यवहार जितका योग्य राहील तितके लोकशाहीमध्ये गुणात्मक बदल होतील. मूल्याधारित शिक्षण व्यवस्था, कुटुंबव्यवस्था व त्यांच्या संस्कारामुळे आपले जीवन समृद्ध झाले असून ही मूल्ये टिकवण्याची गरज आहे. देश जगात सर्वात वेगाने आर्थिक प्रगती करत असून ५ हजार कोटींची अर्थव्यवस्था बनावी, जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनावी हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आपण पूर्ण करू शकू. पण, त्याचसोबत शिक्षण व्यवस्था, त्यावर आधारित जीवनमूल्ये, संस्कार हेही महत्त्वाचे आहेत. त्यादृष्टीने जनता आणि समाजामध्ये विविध क्षेत्रांतील नेतृत्व यांच्यामध्ये समन्वय साधणेही गरजेचे असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

अनेकजण नैतिकता आणि सोयिस्कर कृती या परस्पर विरोधी गोंधळामध्ये अडकलेले दिसतात. पत्रकार असो वा राजकारणी असो, अनेत लोकांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होते. पण, असा गोंधळ ज्येष्ठ पत्रकार व ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे संस्थापक रामनाथ गोयंका यांनी आपल्या आयुष्यात कधी निर्माण होऊ दिला नाही. महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन त्यांनी पत्रकारिता सुरू केली. नदीच्या प्रवाहात मृत मासे वाहून जातात. पण, जिवंत मासे प्रवाहाच्या विरोधात पोहत राहतात, तेच त्यांच्या चैतन्यशीलतेचे लक्षण म्हणता येईल. रामनाथ गोएंकांच्या जीवनाचे सार हेच होते. त्यांनी कधीही तत्त्वांशी, विचारप्रणालीशी, मूल्यांशी तडजोड केली नाही. ज्या व्यक्तींनी देशाची लोकशाही वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले, त्यांचे योगदान सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल. त्यामध्ये रामनाथ गोएंका यांच्या नावाचा प्रामुख्याने समावेश असेल, असे गौरवोद्गार गडकरी यांनी काढले. रामनाथ गोएंका पुरस्कारविजेत्या पत्रकारांचे भविष्यात आणखी मोठे योगदान असेल. दृढनिश्चय, मूल्य, विचारप्रणाली ही आय़ुष्यभर जोडून ठेवले पाहिजेत. कुठल्याही परिस्थिती तडजोड करणार नाही. व्यावसायिक नैतिकता पाळली पाहिजे. देशाच्या पुनर्निर्माणामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे असेल. ही बाब पुरस्कार विजेत्यांकडून शिकण्याजोगी आहे, असेही गडकरी म्हणाले.

आणखी वाचा- गडचिरोलीत चार नक्षलवादी ठार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा डाव उधळला

देशात आणीबाणी लादली गेली नसती तर आपण राजकारणात आलो नसतो असे सांगत गडकरी यांनी रामनाथ गोएंका यांच्या आणीबाणीविरोधातील संघर्षांचा विशेष उल्लेख केला. १९७५ मध्ये आणीबाणी लागू झाली, तेव्हा मी दहावीची परीक्षा देणार होतो. त्यानंतर दोन वर्षांमध्ये माझ्या कुटुंबातील अनेक सदस्यांना ‘मिसा’खाली अटक करण्यात आली होती. त्यावेळी मी ठरवले होते की, मी आणीबाणीविरोधात लढणार. आणीबाणीच्या काळातील संघर्ष आम्ही कोणी आयुष्यभर विसरू शकणार नाही. त्यावेळी आणीबाणीविरोधात लढण्यासाठी रामनाथ गोएंका हे आमच्यासाठी लढण्याचे स्त्रोत होते, असे गडकरी म्हणाले. त्यावेळी महाराष्ट्रात प्रामुख्याने ‘लोकसत्ता’ने आणीबाणीविरोधात संघर्ष केल्याचेही गडकरी म्हणाले.

रामनाथ गोएंका यांनी आणीबाणीच्या पहिल्या दिवसापासून तीव्र संघर्ष केला. गोएंका यांच्याप्रमाणे आणीबाणीविरोधात लढणाऱ्या अनेक कुटुंबांना खूप मोठी किंमत चुकवावी लागली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुखांसोबत रामनाथ गोएंका यांना भेटण्याची संधी मला मिळाली. त्यांचे विचार, कृती, त्यांचे व्यक्तिमत्व बघून मी खूप प्रभावित झालो होतो, असे सांगून गडकरी म्हणाले की, देश आणि समाज बदलत असला तरी मूलभूत बाबी कधीही सोडून चालणार नाही. केशवानंद खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना संविधानाची मूलभूत चौकट बदलता येणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे संविधान मजबूत करणे आणि टिकवणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असेही गडकरी म्हणाले.

‘लोकसत्ता’चे देवेश गोंडाणे यांच्या वृत्तमालिकेचा सन्मान

स्पर्धा परीक्षेतील घोटाळे, भ्रष्टाचार व परीक्षार्थींवर होणारा अन्याय याला वाचा फोडणाऱ्या वृत्तमालिकेसाठी ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचे खास प्रतिनिधी देवेश कुमार अरुण गोंडाणे यांना ‘रामनाथ गोएंका पुरस्कारा’ने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सोबत ‘इंडियन एक्स्प्रेस समूहा’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक गोएंका.