वॉशिंग्टन : ‘भारताबरोबर सर्वांत मोठा व्यापारी करार होणार आहे,’ असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. दोन्ही देशांमध्ये या कराराबाबत चर्चेमध्ये कमालीची प्रगती झाल्याचे संकेत त्यांनी दिले. ट्रम्प यांच्या या घोषणेवरून काँग्रेसने सरकारवर टीका केली असून, देशासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय ‘व्हाइट हाउस’मधूनच माहीत करून घ्यावे लागतील, हे आता स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे.
वाणिज्य मंत्रालयाचे मुख्य सचिव राजेश आगरवाल यांच्या नेतृत्वाखाली भारताचे शिष्टमंडळ अमेरिकेमध्ये चर्चेच्या पुढील फेरीसाठी दाखल झाले आहे. त्याच वेळी ट्रम्प यांनी हे उद्गार काढले आहेत. दोन्ही देशांत ९ जुलैपूर्वी करार होण्याची शक्यता आहे. ट्रम्प म्हणाले, ‘आपण काही मोठे करार करीत आहेत. त्यातील एक लवकरच कदाचित भारताबरोबर होईल. खूपच मोठा असा हा करार असेल. भारतामध्ये (बाजारपेठेत) आपल्याला खुला प्रवेश त्याने मिळेल. चीनबरोबरील करारामध्येही चीनमधील बाजारपेठ खुली करण्याची सुरुवात आपण करणार आहोत. या गोष्टी एरव्ही कधीही घडल्या नसत्या. प्रत्येक देशाशी संबंध अतिशय चांगले आहेत.’ ट्रम्प यांनी चीनबरोबर करारावर मात्र सविस्तर भाष्य केले नाही.
चीनबरोबरही अमेरिकेचा करार
‘प्रत्येक देश करार करण्यास उत्सुक असून, प्रशासन अहोरात्र काम करीत आहे. असे करार करण्यासाठी खरेच कुणी इच्छुक आहेत का, असे काही महिन्यांपूर्वी विचारले जात होते,’ असे ट्रम्प म्हणाले. ‘चीनबरोबर कालच करारावर सही केली. आपल्याबरोबर सगळे जण आहेत. प्रत्येकाबरोबर आपण करार करणार नाही. काही जणांना आपण फक्त पत्र पाठवून आभार मानणार आहोत.’ अमेरिकेचे वाणिज्यमंत्री होवार्ड लुटनिक यांनी एका वाहिनीवर मुलाखत देतानाही चीनबरोबर गेल्या आठवड्यात करार झाल्याचे म्हटले होते. लुटनिक आणि ट्रम्प दोघांनीही करारातील तपशील जाहीर केलेले नाहीत. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने दोन्ही देशांत व्यापाराची चौकट प्रस्थापित झाल्याचे सांगितले आहे.
‘लोकशाही मूल्यांवर अमेरिकेशी संबंध मजबूत’
नवी दिल्ली: भारत-अमेरिकेतील संबंध लोकशाही मूल्यांवर मजबुतीचे आहेत. एकविसाव्या शतकात अमेरिकेबरोबरील परिणामकारक संबंध असेच मजबूत होत जातील, असा आम्हाला विश्वास आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याच वेळी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची व्हाइट हाउस येथील भेटीची नोंदही परराष्ट्र मंत्रालयाने घेतल्याचे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ही माहिती दिली. फील्ड मार्शल मुनिर यांच्या भेटीबाबत अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.
भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी होण्यासाठी व्यापारी कराराच्या मुद्द्याचा वापर केल्याचे ट्रम्प यांनी आतापर्यंत १६ वेळा सांगितले आहे. पुढील काही दिवसांत हा करार होणार असल्याचे ट्रम्प यांनी आता जाहीर केले आहे. त्यांनी या कराराला सर्वांत मोठा करार असे म्हटले आहे. त्यामुळे (तात्पुरते स्थगित केलेले) ‘ऑपरेशन सिंदूर’ तडकाफडकी संपुष्टातच येणार आहे. तसेच, देशासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय ‘व्हाइट हाउस’मधूनच माहीत करून घ्यावे लागतील, हे आता स्पष्ट होत आहे. – जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस</p>
रुबियो-शरीफ यांच्यात चर्चा
इस्लामाबाद : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी प्रदेशात शांतता आणि स्थैर्य वाढविण्यासाठी एकत्र काम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. रुबियो यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. इस्रायल आणि इराणमध्ये कायमस्वरूपी शांततेसाठी आणि स्थिरता राखण्यासाठी एकत्र काम करण्याचे महत्त्व दोन्ही नेत्यांनी मान्य केले, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी सांगितले. तर पाकिस्तानने जारी केलेल्या निवेदनात पाकिस्तान-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी, विशेषत: व्यापार वाढविण्यासाठी एकत्र काम करणे सुरू ठेवण्यावर एकमत दर्शवले. पश्चिम आशियातील सद्या:स्थितीवर भाष्य करताना शरीफ यांनी पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यात रचनात्मक भूमिका बजावत राहील, असे सांगितले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुकही केले. इराण आणि इस्त्रायल तसेच भारत पाकिस्तानमध्ये युद्धविरामासाठी अमेरिकेने बजावलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी रुबियो यांचे आभार मानले.