Donald Trump’s One Big Beautiful Bill passes in US Congress : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या महत्त्वकांक्षी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ची मोठी चर्चा सुरू होती. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी एक मोठा राजकीय विजय मिळला आहे. अमेरिकन काँग्रेस (संसद) मध्ये ट्रम्प यांचे टॅक्स अँड स्पेंडिंग विधेयक म्हणजेच ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ अत्यंत कमी मतांच्या फरकाने मंजूर झाले आहे. आता त्यावर फक्त स्वाक्षरी होणे बाकी आहे. गुरूवारी अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रसेंटेटिव्हमध्ये हे विधेयक २१८-२१४ मतांनी मंजूर झाले आणि शुक्रवारी हे ८६९ पानांचे विधेयक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले आहे.
हा कायदा अमेरिकेच्या सिनेटमध्ये यापूर्वीच मंजूर झाला आहे. हे विधेयक सिनेटमध्ये ५१-५० च्या फरकाने मंजूर करण्यात आले होते, ज्यासाठी उप-राष्ट्राध्यक्ष जे. डी व्हान्स यांनी निर्णायक मत दिले होते. हे विधेयक मंजूर झाल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात केलेली करकपात कायम होईल, तसेच नवीन कर सवलत मिळेल आणि फेडरल नेट सेफ्टी प्रोग्राममध्ये कपात होईल.
या विधेयकमामुळे देशाच्या ३६.२ ट्रिलीयन डॉलर्सच्या कर्चात ३.४ ट्रिलियन डॉलर्सची भर पडणे अपेक्षित आहे, असे कॉग्रेसनल बजेट ऑफिस(CBO) ने म्हटले आहे. पुढील १० वर्षात यामुळे कर महसूल हा अंदाजे $४.५ ट्रिलियनने कमी होईल तर फेडरल स्पेंडिंगमध्ये $१.१ ट्रिलियनने कपात होईल आणि हे प्रामुख्याने मेडिकेड कमी करून केले जाईल.
रिपब्लिकन पक्षात देखील फिस्कल परिणामांबद्दल चिंता असून देखील फक्त दोन जीओपीच्या फक्त दोन प्रतिनिधींनी – पेनसिल्व्हेनिया येथील ब्रायन फिट्झपॅट्रिक आणि केंटकी येथील थॉमस मॅसी – या विधेयकाच्या विरोधात मतदान केले.
डेमोक्रॅटीक पक्षाने एकमताने या कायद्याला विरोध केला आणि हा कायदा श्रीमंतांसाठी फायद्याचा असून यामुळे लाखो जण हेल्थ केअरपासून वंचित राहतील अशी टीका त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
‘वन बिग ब्युटीफुल बिल’ काय आहे?
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेला दिलेल्या काही प्रमुख आश्वासनांच्या आधारे दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. यातील काही आश्वासने, जसं की विविध देशांमधून आयातीवर शुल्क लादणे, कार्यकारी आदेशांद्वारे अंमलात आणता येतात. परंतु काही आश्वासने अशी आहेत, ज्यांची पूर्तता करण्यासाठी कायद्यात बदल करणे आवश्यक आहे, जो अमेरिकन काँग्रेसचा (प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट यांचा समावेश) विशेष अधिकार आहे.
अशा परिस्थितीत ट्रम्प यांना त्यांच्या सर्व निवडणूक आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काही गोष्टींसाठी काँग्रेसची मान्यता घ्यावी लागेल. हे लक्षात घेता, ट्रम्प यांनी त्यांच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर बदलांचा समावेश करून ‘बिग ब्युटीफुल बिल’ तयार केले. या विधेयकात ट्रम्प यांनी त्यांचा धोरणात्मक अजेंडा आणि प्रचारातील आश्वासने एकत्रितपणे समाविष्ट केलीली आहेत.