Donald Trump said Musk lost his mind : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक एलॉन मस्क यांच्यात दुरावा आला आहे. एलॉन मस्क हे ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडल्यानंतर या दोघांमधील मतभेद आता जाहीर झाले आहेत. यादरम्यान आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मस्क याच्याबरोबर चर्चा करण्यासही अनुत्सुकता दाखवली आहे. ट्रम्प यांनी आपल्याला मस्क यांच्याशी बोलण्यात विशेष स्वारस्य नाही, असे एबीसी न्यूजशी बोलताना म्हटले आहे.
“तुम्ही तो व्यक्ती म्हणताय का ज्याचे डोके ठिकाणावर नाही?” असे ट्रम्प यावेळी म्हणाले, तसेच मस्क यांना बोलायचे होते पण आपण त्या संवादासाठी तयार नव्हतो, असेही ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले.
दुसरीकडे मस्क यांनी समेटाबद्दल सूचक वक्तव्य केले होते, त्यांनी बिल अॅकमन (Bill Ackman) यांनी या दोघांना केलेल्या ‘महान देशाच्या फायद्यासाठी शांतता स्थापन करा’ या अवाहनाला प्रतिसाद देत एक्सवर पोस्ट केली होती. ज्यामध्ये मस्क “तुम्ही चुकीचे नाहीत,” असे म्हणाले होते.
डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या गुरूवारी झालेल्या शाब्दिक वाद झाला. यानंतर दोघांमध्ये गोष्टी सुरळीत करण्याच्या उद्देशाने व्हाईट हाऊसने शुक्रवारी मस्क यांच्याशी फोनवरून संपर्क साधला जाणार आहे, असे वृत्त पॉलिटिकोने दिले. मात्र शुक्रवारी दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी अशा प्रकारचा कोणताही फोन कॉल करण्याचे नियोजन नसल्याचे अनेक रिपोर्ट्समधून सांगण्यात आले.
नेमका वाद काय आहे?
डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील वाद हा सोशल मीडियावर सुरू झाला. एलॉन मस्क यांनी ‘टॅक्स अँड स्पेंडिंग बिल’ यावर टीका केली, ज्यानंतर ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे इलॉन मस्क यांच्याबाबत आपण निराश असल्याचे म्हटले . यावर मस्क यांनी प्रत्युत्तर देत राष्ट्राध्यक्षांच्या व्यापार धोरणांमुळे आर्थिक मंदी येईल, असे म्हटले आणि याबरोबरच बाल लैंगिक गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलेल्या जेफ्री इपस्टाईन (Jeffrey Epstein) यांच्याशी ट्रम्प यांच्या संबंधांबद्दल विधान केले.
ट्रम्प यांनी अमेरिकेचे सरकारी कंत्राटे रद्द करण्याच्या धमकीला उत्तर देत मस्क यांनी नासा वापरत असलेले ड्रॅगन स्पेसक्राफ्ट रिटायर करतील अशी पोस्ट एक्सवर केली. पण काही वेळाने त्यांनी ही पोस्ट मागे घेतली आणि “चांगला सल्ला आहे. ओके. आम्ही ड्रॅगन डी-कमीशन करणार नाहीत,” असे म्हटले.
दरम्यान इलॉन मस्क यांनी ट्रम्प सरकारमधून बाहेर पडल्यानंतर ट्रम्प सरकारच्या नव्या टॅक्स अँड स्पेंडिंग विधेयकावर (Tax and Spending Bill) जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच याबाबत मस्क यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या विधेयकाचा ‘घृणास्पद कृत्य’ असा उल्लेख केला होता. तसेच या विधेयकामुळे खूप तोटा होईल असेही म्हटले होते. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने आणलेल्या नव्या कर विधेयकात इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी सूट रद्द करण्यात आल्यामुळे इलॉन मस्क हे नाराज असल्याचं बोललं जात आहे.