सरकारी अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी गैरवापर केल्याची अनेक प्रकरणं आजवर उजेडात आली आहेत. यातल्या काही प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींना शिक्षा झाली तर काही प्रकरणं अद्याप न्यायालयांमध्ये सुनावणीच्या रांगेत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातला एक Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला एका औषधांच्या दुकानात अरेरावी करत लाच मागत असल्याचं दिसत आहे. या महिला अधिकाऱ्याचं नाव निधी पांडे आहे!

नेमका प्रकार काय?

उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात निधी पांडेंची औषध निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आपल्या पहिल्या नियुक्तीमध्ये साधारणपणे अधिकारी वा कर्मचारी वर्ग स्वत:ला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतात. पण निधी पांडे मात्र भलत्याच गोष्टी करण्यात व्यग्र झाल्या. पहिल्याच पोस्टिंगमध्ये निधी पांडेंनी परिसरातल्या औषध विक्रेत्यांना हैराण करून सोडलं. आधी छापा, मग तपासणी आणि पुढे भरमसाठ पैशांची ‘तडजोड’ असाच काहीसा निधी पांडेंचा खाक्या होता. जनसत्तानं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

सचिन गुप्ता नावाच्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्या व्हिडीओमधील महिला निधी पांडेच असल्याचा दावा संबंधित व्यक्तीने केला आहे. शामलीतील एका औषधांच्या दुकानात निधी पांडेंनी त्यांच्या पथकासह छापा टाकला. तिथे त्यांना नियमात न बसणाऱ्या काही गोष्टी आढळल्या. पण त्यावर कारवाई किंवा विहीत दंड आकारण्याऐवजी निधी पांडे थेट औषध विक्रेत्याला परवाना रद्द करण्याची धमकी देऊ लागल्या. आणि तसं न करण्याच्या बदल्यात त्यांनी भरमसाठ रक्कम मागितली.

“मॅडम, यानं भाजीबाजार मांडलाय!”

निधी पांडे यांच्यासोबत या छाप्यात असणाऱ्या व्यक्तीनंच हा व्हिडीओ काढल्याचं त्यावरून दिसत आहे. “मॅडम इसने सब्जी-मंडी लगाकर रखी है.. कभी २५ हजार बोलता है, कभी ३० हजार बोलता है”, असं म्हणत या व्यक्तीनं निधी पांडे यांच्याकडे तक्रार केली. त्यावर निधी पांडे भडकल्या आणि दुकानदाराला अद्वातद्वा सुनावू लागल्या. “तू माझ्याशी बार्गेनिंग करू नकोस. ही बनियागिरी माझ्यासमोर करायची नाही. तुला दुकान चालवायचं आहे की नाही हे ठरव. नाहीतर आत्ता एफआयआर दाखल होईल”, असा दमच निधी पांडेंनी त्या दुकानदाराला भरला.

शेवटी दुकानदाराला धमकावून त्यांनी पैसे आणायला पिटाळलं. शिवाय, “जास्त हुशारी करू नकोस. मी इथेच बसले आहे”, असं म्हणत त्या स्वत: दुकानात थांबल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

लाचप्रकरणी महसूल सहायकासह पोलीस अधिकारी जाळ्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विभागाची कारवाई

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विभागां तातडीनं त्यांच्यावर कारवाई करत त्यांचं निलंबन केलं आहे. जनसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार, निधी पांडे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर परिसरातील औषध विक्रेत्यांनी आनंद व्यक्त केला!