दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना पैशाच्या अफरातफरीच्या प्रकरणात जैन यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी अटक केली. याच प्रकरणावरुन आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जैन यांच्या अटकेनंतर केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाने केलीय. सत्येंद्र जैन हे केजरीवाल यांच्या अत्यंत नजिक मानले जातात. केजरीवाल यांनी त्यांच्याकडे उर्जा, सार्वजनिक बांधकाम व आरोग्य अशी तीन मंत्रालयांची जबाबदारी सोपवली आहे. २०१७ मध्ये ‘सीबीआय’ने जैन यांच्याविरोधात चार कंपन्यांच्या माध्यमांमधून पैशाची अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल केला होता. गेल्या महिन्यामध्ये ‘ईडी’ने या कंपन्यांची ४.८१ कोटीची मालमत्ता जप्त केली होती. याच प्रकरणात आता जैन यांना अटक झाल्यानंतर आप विरुद्ध भाजपा असा संघर्ष पुन्हा उफाळून आलाय. असं असतानाच आता या प्रकरणावरुन शिवसेनेनं केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. यामध्ये राज्यसभेसाठी भाजपाकडून केला जाणारा घोडेबाजार, अनिल परब, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याविरोधात झालेली कारवाई अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधलाय.

नक्की वाचा >> मुख्यमंत्रीपदावरुन सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांमध्ये तू तू मैं मैं सुरु असतानाच भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “बहुदा उद्धव ठाकरे…”

चौकश्यांचा ससेमिरा लावणे हा ‘ईडी’चा खेळ
“दिल्लीतील ‘आप’चे मंत्री सत्येंद्र जैन यांनाही ‘ईडी’ने अटक केली आहे. जैन हे दिल्लीचे आरोग्यमंत्री आहेत. जैन यांच्याकडे उद्योग, ऊर्जा, नगर विकास आणि पाणीपुरवठा ही खातीदेखील आहेत. जैन हे ‘आप’मधील एक वजनदार नेते आहेत, पण आठ वर्षांपूर्वीच्या एका जुन्या प्रकरणात ‘ईडी’ने त्यांना अटक केली. मंत्र्यांना व राजकारण्यांना अटक करणे, त्यांना समन्स पाठवणे, त्यांच्यामागे चौकश्यांचा ससेमिरा लावणे हा ‘ईडी’चा खेळ झाला आहे,” असा टोला शिवसेनेनं लागवलाय.

भाजपाने या यंत्रणेला स्वतःच्या फायद्यासाठी
“महाराष्ट्रातील दोन मंत्री अनिल देशमुख व नवाब मलिक यांनाही ‘ईडी’ने अटक केली. आणखी एक मंत्री अनिल परब यांच्या मागेही चौकशी व कारवाईचा ससेमिरा लावला आहे. हसन मुश्रीफ यांनाही ‘ईडी’च्या नावे धमकावले जात आहे. एकनाथ खडसे यांचे जावईदेखील ‘ईडी’च्या कोठडीत आहेत. प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांच्यासारखे शिवसेनेचे लोक ‘ईडी’शी राजकीय झुंज देत आहेत. आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करणारी ही यंत्रणा असली तरी भाजपाने या यंत्रणेला स्वतःच्या फायद्यासाठी राजकीय मैदानात उतरवले आहे,” अशी टीका शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून केलीय.

नक्की वाचा >> CM पदावरुन सेना विरुद्ध NCP: मनसे म्हणते, “काही दिवसांत सुप्रिया महिला मुख्यमंत्री आणि संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री…”

शरण या नाहीतर तुरुंगात जा
“सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर ‘आप’चे केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंग वगैरे प्रमुख नेत्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनीदेखील आपण जैन यांच्याविरुद्धच्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे पाहिली असून हा गुन्हा बनावट असल्याचा आरोप केला आहे. मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांच्यावरील कारवाई राजकीय सूडातून करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. तेथे निवडणुका व पक्षाची जबाबदारी सत्येंद्र जैन यांच्याकडे होती. जैन यांनी हिमाचलमध्ये भाजपासमोर आव्हान उभे केले. म्हणूनच आठ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात भाजपाने ‘ईडी’च्या माध्यमातून जैन यांना तुरुंगात पाठवले. जैन हेच एकमेव अशा सूडाचे बळी नाहीत. देशभरात जे लोक भाजपाला प्रखर विरोध करीत आहेत त्यांना असेच लटकवले जाईल, शरण या नाहीतर तुरुंगात जा, असाच संदेश दिल्लीतील मोदी सरकार देत आहे. हा एकप्रकारे अतिरेकच आहे,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.

नक्की वाचा >> संजय राऊत – छत्रपती शाहू महाराज भेटीबद्दल बोलताना नितेश राणेंचा तोल सुटला; म्हणाले, “शाहू महाराजांचं मी खरंच…”

‘ईडी’ घरात घुसवून अशा प्रकारे
“कश्मीरमध्ये बडगाम जिह्यातील चादुरा येथे एका टीव्ही मालिका अभिनेत्रीची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. आमरीन भट असे त्या अभिनेत्रीचे नाव. दोन अतिरेकी आमरीनच्या घरात घुसले. ‘‘तीन दिवसांसाठी एका लग्न समारंभात गायला ये’’ असे फर्मान त्या अतिरेक्यांनी सोडले. आमरीन म्हणाली, ‘‘मी गाते, पण लग्नात वगैरे गात नाही.’’ यावर अतिरेक्यांनी तिला गोळ्याच घातल्या. भारतीय जनता पक्ष आपल्या विरोधकांच्या बाबतीत नेमके हेच करीत आहे. जे भाजपाच्या तालावर नाचत नाहीत, त्यांना ‘ईडी’ घरात घुसवून अशा प्रकारे ‘मारले’ जात आहे. म्हणजेच तुरुंगात पाठवले जात आहे. सत्येंद्र जैन यांच्या बाबतीत ‘ईडी’ने हाच प्रकार केला आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> “राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लावली; आता त्यांची मजल छत्रपतींच्या घरापर्यंत गेलीय”

भाजपा मंत्र्यांचं एकही आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण…
“जैन यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांची चार कोटी ८१ लाख रुपयांची मालमत्ता ‘ईडी’ने जप्त केली आहे. जैन यांची गेली आठ वर्षे चौकशी सुरू आहे, पण अटकेचा मुहूर्त काढला तो हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी. हिमाचलमधून बाहेर पडा नाहीतर ‘ईडी’चे क्षेपणास्त्र सोडू, हाच त्यांचा बदला आहे. ‘ईडी’चे लोक हे भाजपाचे हस्तक म्हणून सरळ सरळ वापरले जात आहेत. भारतीय जनता पक्षातले सर्व मंत्री, पुढारी यांचे एकही आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण त्यांना दिसू नये याचे आश्चर्य वाटते,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> “भाजपानेच संभाजीराजेंची कोंडी केली, राजे फडणवीसांना भेटले व पाठिंब्यासाठी…”; राज ठाकरेंचाही उल्लेख करत शिवसेनेचा हल्लाबोल

हे कोट्यवधी रुपये कोठून व कसे येत आहेत
“आता महाराष्ट्रातच राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार करण्याचे भाजपाने ठरवलेच आहे. महाविकास आघाडीस पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांना फोडण्याची भाषा भाजपाच्या सहाव्या उमेदवाराने सुरू केली. ही फोडाफोडी कोल्हापूरच्या गुळांच्या ढेपेच्या बदल्यात नक्कीच होणार नाही. थैल्यांचा मुक्त वापर करून महाराष्ट्रातील राजकारणात आर्थिक गैरव्यवहार करण्याचाच त्यांचा इरादा आहे. मग हे कोट्यवधी रुपये कोठून व कसे येत आहेत, या पैशांचे ‘मनी लॉण्डरिंग’ कोठून कसे होत आहे हे काय आम्ही ‘ईडी’, ‘सीबीआय’ला सांगायचे,” असा चिमटा शिवसेनेनं काढलाय.

नक्की वाचा >> “किमान राजघराण्यातील व्यक्तींनी…”; संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंचा छत्रपतींच्या घराण्याला सल्ला

हा राजकीय सूडाचा खेळ
“अनिल परबांच्या दापोलीतील रिसॉर्टचे सांडपाणी शोधण्यासाठी ‘ईडी’ने मुंबईसह १७ ठिकाणी धाडी घातल्या हे आक्रितच नव्हे काय? ‘‘मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार भ्रष्टाचार’’ असे बोंबलून साप समजून भुई धोपटण्याचा प्रकार भाजपावाले करीत आहेत व शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्यावर इन्कम टॅक्सपासून ‘ईडी’पर्यंत सगळ्यांनी कारवाया केल्या. मग तसेच काही असेल तर स्थायी समिती व सुधार समितीवर वर्षानुवर्षे ‘चरणारे’ भाजपाचे ‘मेंबर्स’ आहेत व या कथित भ्रष्टाचारप्रकरणी ‘ईडी’ व इन्कम टॅक्सने भाजपाच्या सर्व मेंबरांना अटक केली पाहिजे, पण कारवाया फक्त विरोधकांवर. हा राजकीय सूडाचा खेळ त्यांच्यावरही उलटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही वारंवार दिला आहे व देत आहोत,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> “किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता…”; सोमय्यांचा हसरा फोटो शेअर करत NCP च्या मिटकरींचा टोला

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट गाढवांना अभय का?
“‘ईडी’तल्या वानखेडे पॅटर्नमुळे आज भाजपाला गारगार वाटत असले तरी उद्या त्याचे चटके सर्वाधिक त्यांनाच बसतील. सत्येंद्र जैन, नवाब मलिक, अनिल देशमुख अशा मंत्र्यांवर कारवाई होऊ शकते, पण अटक सत्र व पुन्हा जामीनही मिळू न देणे हा सूडच आहे. ‘आप’चे एक मंत्रीही आत गेले. हे बरे नाही! मंत्र्यांच्या अटकेचाही घोडेबाजार सुरू झाला आहे. त्यात सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट गाढवांना अभय का?,” असा प्रश्न अग्रलेखाच्या शेवटी विचारण्यात आलाय.