इजिप्तमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना तसेच सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या मुस्लिम महिलांना बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. इजिप्तची संसद तसा कायदा आणणार असून या कायद्याचा मसुदाही तयार करण्यात आला आहे.

या ऐतिहासिक निर्णयाबाबत बोलताना इजिप्तमधील महिला खासदार अम्ना नोसेर म्हणाले, मुस्लिम महिलांना बुरखा घालणे इस्लाममध्ये बंधनकारक नाही. त्यामुळे जे मुळचे मुस्लिम नाहीत त्यांनाही याचे बंधन नाही. नोसेर या अल अझहर विद्यापीठातील तुलनात्मक न्यायशास्त्र विभागाच्या प्राध्यापिकाही आहेत.

नोसेर म्हणाल्या, बुरखा घालणे हे ज्यू लोकांची परंपरा असून ती प्रामुख्याने अरेबिअन द्विपकल्पात इस्लाम धर्माच्या स्थापने आधीपासून पाळण्यात येत होती. मात्र, त्यानंतर कुराणमध्ये त्याचा समावेश झाला. मात्र, कुराणमध्ये बुरखा परिधान करण्याबाबत सांगितलेली बाब आणि सध्याची प्रचलित पद्धत यात विरोधाभास आहे. कारण, कुराणने केस झाकलेले आधुनिक कपडे परिधान करण्याबाबत सांगितले आहे. मात्र, यात तोंड झाकून घेण्याबाबत म्हटलेले नाही, असे नोसेर यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत इजिप्तमध्ये मुस्लिम महिलांवर नकाब (बुरखा) घालण्याबाबत अनेक प्रकारची बंधने घालण्यात आली आहेत. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यांत कैरो विद्यापीठाने वैद्यकीय संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नर्सेस आणि महिला डॉक्टरांना बुरखा घालण्यास बंदी घातली होती. रुग्णांच्या हक्कासाठी ही बुरखाबंदी आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत याच विद्यापीठाने महिला शिक्षकांवर वर्गात शिकवताना बुरखा घालण्यास बंदी घातली होती. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे बुरखा घालण्याबाबत तक्रार दिली होती. कारण, बुरखा घालून शिकवताना विद्यार्थ्यांशी प्रभावीपणे संवाद साधताना अडचणी येत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.