Elon Musk Warns Donald Trump’s Big Beautiful Bill Will Wipe Out Jobs: अमेरिकन उद्योगपती आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटीफुल बिल’वर टीका केली आहे. मस्क म्हणाले की, या विधेयकामुळे अमेरिकेतील लाखो नोकऱ्या जातील आणि देशाचे मोठे धोरणात्मक नुकसान होईल. इतकेच नाही, तर मस्क यांनी हे विधेयक पूर्णपणे वेडेपणाचे आणि विध्वंसक असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये एलॉन मस्क यांनी म्हटले की, “सिनेटच्या नवीन विधेयकामुळे लाखो नोकऱ्या जातील आणि यामुळे आपल्या देशाचे धोरणात्मकदृष्ट्या नुकसान होईल. या कायद्यामुळे जुन्या उद्योगांना सवलती मिळतील, परंतु यामुळे भविष्यातील उद्योग नष्ट होतील.” ते पुढे म्हणाले, “हे विधेयक पूर्णपणे वेडेपणा आणि विध्वंसक आहे.”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांच्यात वादग्रस्त ‘बिग ब्युटीफुल बिल’वरून मतभेद आहेत. ट्रम्प त्याचे जोरदार समर्थन करतात, तर मस्क या विधेयकाच्या विरोधात आघाडीवर आहेत. २२ मे रोजी हे विधेयक प्रतिनिधी सभागृहात मंजूर झाले होते. विधेयकाच्या बाजून २१५ तर विरोधात २१४ मते पडली होती. आता ते सिनेटमध्ये ५१-४९ अशा फरकाने मंजूर झाले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क ‘बिग ब्युटीफुल बिल’वरून आमनेसामने आले आहेत. ट्रम्प यांनी वारंवार या विधेयकाचे समर्थन केले आहे, तर एलॉन मस्क यांनी या विधेयकाला विरोध केला आहे. ट्रम्प यांनी या विधेयकाचे वर्णन ‘देशभक्ती’ म्हणून केले होते, तर मस्क यांनी हे विधेयक म्हणजे वायफळ खर्च असल्याचे म्हटले होते.

बिग ब्युटीफुल बिल म्हणजे काय?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेला दिलेल्या काही प्रमुख आश्वासनांच्या आधारे दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. यातील काही आश्वासने, जसे की विविध देशांमधून आयातीवर शुल्क लादणे, कार्यकारी आदेशांद्वारे अंमलात आणता येतात. परंतु काही आश्वासने अशी आहेत, ज्यांची पूर्तता करण्यासाठी कायद्यात बदल करणे आवश्यक आहे, जो अमेरिकन काँग्रेसचा (प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट यांचा समावेश) विशेष अधिकार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा परिस्थितीत ट्रम्प यांना त्यांच्या सर्व निवडणूक आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काही गोष्टींसाठी काँग्रेसची मान्यता घ्यावी लागेल. हे लक्षात घेता, ट्रम्प यांनी त्यांच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर बदलांचा समावेश करून ‘बिग ब्युटीफुल बिल’ तयार केले आहे. या विधेयकात ट्रम्प यांनी त्यांचा धोरणात्मक अजेंडा आणि प्रचारातील आश्वासने एकत्रितपणे समाविष्ट केली आहेत.