नवी दिल्ली : नीतिमत्ता समितीकडून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरोधात गंभीर कारवाईची शिफारस केली जाण्याचे संकेत मिळाले आहेत. कदाचित त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली जाऊ शकते असे सांगितले जात आहे. या समितीची गुरुवारी बैठक होणार असून त्यामध्ये यासंबंधी मसुदा अहवाल स्वीकारला जाणार आहे. मात्र, त्यामध्ये विरोधी पक्षाच्या सदस्यांनी असमहती दर्शवणाऱ्या नोंदी असतील अशी अपेक्षा आहे.

मोइत्रा यांनी लोकसभेत अदानी समूहाला लक्ष्य करणारे प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच आणि किंमती भेटवस्तू घेतल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. तसे पत्र त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिल्यानंतर महुआ मोइत्रा यांची चौकशी सुरू झाली.

हेही वाचा >>> कालेश्वरम सिंचन प्रकल्पाचा मुद्दा तापला; तेलंगण विधानसभा निवडणुकीत विरोधक आक्रमक

नीतिमत्ता समितीने २ नोव्हेंबरला महुआ मोइत्रा यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्या बैठकीत समितीचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार विनोद कुमार सोनकर यांनी असभ्य आणि वैयक्तिक प्रश्न विचारल्याचा आरोप करत त्या बैठकीतून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई होईल असे संकेत मिळाले होते.

या बैठकीत मोइत्रा यांना पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या वर्तनाबद्दल नाराजी नोंदवली जाण्याची शक्यता आहे. बसपचे खासदार दानिशअली आणि जदयूचे खासदार गिरीधारी यादव यांच्या वर्तनाबद्दल समितीचे अध्यक्ष विशेष नाराज असल्याचे समजते. या दोघांचे वर्तन अनैतिक असल्याचा आरोप सोनकर यांनी केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोइत्रांविरोधात सीबीआय चौकशी

दुबे लोकपालांनी महुआ मोइत्रा यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती त्यांच्याविरोधात तक्रार करणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी बुधवारी दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना, सीबीआयने आधी अदानी समूहाच्या कोळसा घोटाळय़ाची चौकशी करण्यासाठी एफआयआर दाखल करावी असे मोइत्रा यांनी म्हटले आहे. तसेच ‘लोकपाल जिवंत आहे’ अशी खोचक प्रतिक्रियाही ‘एक्स’वर व्यक्त केली.